ऑक्टोबर हीटपाठोपाठ लोडशेडींगचा दणका

  • राज्यात 2 हजार 200 मेगावॅट वीजेची कमतरता

मुंबई, 5 ऑक्टोंबर 2017/AV News Bureau:

ऑक्टोबर हीटची लाट संपूर्ण राज्यात पसरल्यामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच आता मागणीच्या तुलनेत वीजेचा पुरवठा कमी झाल्यामुळे राज्यातील वीजेअभावी नागरिकांचे आगीतून फुफाट्यात अशी अवस्था झाली आहे. सध्या 19 हजार 900 मेगावॅटची गरज असताना सुमारे 15 हजार 700 मेगावॅट इतकी वीज उपबल्ध होत आहे. त्यामुळे 2 हजार 200 मेगावॅट इतक्या विजेची कमतरता भासू लागल्यामुळे  अ आणि ब वर्गातील शहरांमध्येही सक्तीचे लोडशेडींग करण्याची पाळी महावितरणवर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागापाठोपाठ आणि शहरांनाही लोडशेडींगचा तडाखा सोसावा लागत असून विजेअभावी नागरीक चांगलेच हैराण झाले आहेत.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  राज्यात 17 हजार 900 मेगावॅट इतकी विजेची गरज आहे. मात्र केवळ 15 हजार 700 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध झाली असून तब्बल 2 हजार 200 मेगावॅट इतक्या विजेचा तुटवडा भासत आहेत. वीज निर्मिती केंद्रात पुरेशा प्रमाणात कोळशा उपलब्ध होत नसल्यामुळे विद्युत निर्मितीला त्याचा फटका बसत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या महानिर्मिती कंपनीव्यतिरिक्त इतर विद्युत निर्मिती कंपन्यांकडून वीज घेण्यात येत आहे.

5 ऑक्टोबर रोजी  उपलब्ध झालेली वीज

  • महानिर्मितीकडून 4600 मेगावॅट
  • अदानी कंपनीकडून 1700 मेगावॅट
  • रतन इंडियाकडून 500 मेगावॅट
  • केंद्रीय प्रकल्पांतून 3800 मेगावॅट
  • जेएसडब्लू कंपनीकडून 300 मेगावॅट
  • सीजीपीएलकडून 560 मेगावॅट
  • एम्कोकडून 100 मेगावॅट
  • पवन उर्जाकडून 100 ते 200 मेगावॅट
  • उरण गॅस प्रकल्पातून 380 मेगावॅट
  • जलविद्युत प्रकल्पातून 1000 ते 1200 मेगावॅट
  • खुल्या बाजारातून 700 मेगावॅट विजेची खरेदी

सध्या मागणीच्या प्रमाणात विजेचा पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.