सोशल मिडीयाचा वापर जपून करा

सेना प्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2018

सत्तरावा सेना दिवस आज साजरा होत आहे. सेना प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख सुनील लांबा आणि वायु दल प्रमुख बिरेंदर सिंद धानोआ यांनी आज सकाळी दिल्ली येथील अमर जवान ज्योती इथं हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली. सेना दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लष्कर प्रमुख रावत यांनी 5 मरणोत्तर पदकांसह 15 सेना पदके प्रदान केली.

सीमेपलीकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. लष्कर कधीही विरोधी राष्ट्रवादी शक्तींना त्यांच्या कारावाईमध्ये यशस्वी होऊ देणार नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही कारवाईचे उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार असल्याचे लष्कर प्रमुख रावत यांनी सांगितले. सोशल मीडियाचा वापर भारता विरोधात होऊ शकतो त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर जपून करा आणि हा गैरवापर रोखण्यासाठी सावध राहण्याचा इशाराही लष्कर प्रमुख रावत यांनी यावेळी दिला.

दरम्यान, जम्मू काश्मीर इथल्या नियंत्रण रेषेवरील कोटली सेक्टर येथे भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या 7 दहशतवाद्यांना ठार केले. हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते.