बाटल्यांच्या झाकणांपासून फिफाची शिल्पाकृती

नवी मुंबई, 8 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

फुटबॉल खेळाचा प्रचार व्हावा तसेच स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने “टाकाऊतून टिकाऊ” ही संकल्पना राबवत नवी मुंबई महानगरपालिका आणि ग्रीन सोसायटी फोरम या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांच्या झाकणांपासून फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धा अविष्कृत करणारे “रिसायकलेडेलिक फिफा म्युरल” हे  शिल्प महापालिका मुख्यालयासमोर साकारण्यात आले आहे.

टाकऊतून टिकाऊ ही संकल्पना राबवित ग्रीन सोसायटी फोरमने यापूर्वीही महापालिका मुख्यालयात संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्ड पासून भारताच्या नकाशाची शिल्पाकृती साकारली होती. ज्याला ‘मदर इंडिया बोर्ड’ असे नाव देण्यात आले होते. त्याचप्रकारे आता 7 हजार टाकून दिलेल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची झाकणे जमा करून फिफा स्पर्धेच्या निमित्ताने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  फिफा वर्ल्ड कपशी संबंधित हे आकर्षक शिल्प साकारले आहे. साडेसहा फुट व्यासाचे हे वर्तुळाकार शिल्प 250 किलो वजनाचे आहे.

बनॉय के, मच्छिंद्र पाटील, जसपालसिंग नोएल, ऑल्वीन ऑगस्टीन यांच्या संकल्पनेतून कलादिग्दर्शक किशोर विश्वास यांच्यासह त्यांचे सहकारी सद्दाम हुसेन तसेच निखिलकुमार, डॉन वारके, नहीद अहमद, गफूर एम, विजयन के, मोहम्मद आरीफ, हरपल नॉएल, अली अझीयार यांनी हे कलात्मक शिल्प साकारले आहे.