महाराष्ट्रातील 15 जिल्हे हागणदारीमुक्त

मुंबई, 5 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

स्वच्छता अभियानांतर्गत  महाराष्ट्रातील 15 जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून 198 तालुके व 31 हजार 172 गावांचाही समावेश हागणदारीमुक्त यादीत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मुंबईत दिली.

जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांचे योगदान महत्वाचे असते. रायगड व सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम केल्यामुळेच जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. शासकीय स्तरावर अनुदान तसेच शौचालय बांधणीसाठी मदत करता येते परंतु शौचालय बांधून त्याचा वापर करणे तसेच स्वच्छता अंगिकारणे यासाठी लोकांची जीवनशैली व मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यासाठी प्रबोधन व प्रचार करणे महत्वाचे असून प्रबोधनासाठी धर्मगुरु, किर्तनकार यांचे सहाय्य घेवुन लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत असे आवाहन लोणीकर यांनी केले.

रायगड व सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त

रायगड व सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त केल्याबद्दल सोलपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड व रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.साळुंखे तसेच या दोन्ही जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरुपात ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचा लोणीकर यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवुन सत्कार केला.

सोलपूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांनी सोलपूर जिल्ह्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती सादरीकरणाद्वारे यावेळी दिली. रायगड जिल्ह्यात स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी यावेळी दिली.

यावेळी रायगड जिल्यातील गटविकास अधिकारी नरेंद्र खेडकर, शबाना मोकाशी, ग्रामसेवक टी. एस. दाजीर, एस. एस. पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, महादेव बेळे, ग्रामसेवक ज्योती पाटील, ए. पी. बारस्कर यांचा लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.