त्या 41 जणी

  • माटुंगा रेल्वे स्थानकाचा कारभार पाहणाऱ्या कारभारणींची लिम्का बूकमध्ये नोंद

मुंबई, 8 जानेवारी 2018/ avirat vaatchal news:

त्या 41 जणी दिवसरात्र काम करतात. लाखो लोकांचा जीव त्यांच्या हातात आहे. एक चूक होत्याचं नव्हतं करू शकते. मात्र आपल्यावर टाकलेला विश्वास त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर सार्थ ठरविला. एवढेच नव्हे तर पुरूषांच्या तोडीस तोड कामगिरी करीत आजच्या महिला किती सक्षम आहेत,  हेच जणू त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या अविरत सुरू असलेल्या वाटचालीने विक्रमालाही गवसणी घातली. त्यांच्या कामगिरीची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदली गेली. ही कामगिरी केली आहे, मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकाचा गाढा यशस्वीपणे हाकणाऱ्या त्या 41 महिला कर्मचाऱ्यांनी.

सहा महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्थानकाचा कारभार पूर्णपणे महिलांच्या हाती देण्यात आला. स्टेशन मास्टरपासून शिपायापर्यंत आणि प्रवाशांसाठी घोषणा करणाऱ्या निवेदीकेपासून गाड्यांचे वेळापत्रक सांभाळणाऱ्या तंत्रज्ञांपर्यंत सगळेच कर्मचारी महिला. म्हणजे एकही पुरूष कर्मचारी नाही. रेल्वेच्या वरिष्ठांनी आपल्या महिला कर्मचारी सक्षम असल्याबाबत विश्वास दाखवत संपूर्ण रेल्वे स्थानकाची जबाबदारी या 41 जणींवर सोपवली. सुरुवातीला काही अडचणी आल्या. मात्र त्या लिलया दूर सारत रेल्वे अविरत सुरू कशी राहील, हे त्यांनी पाहीले. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी हे आव्हान यशस्वी पेलत कारभार उत्तम सांभाळला आणि आता या आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्स 2018 मध्ये करण्यात आली आहे. हे स्थानक पूर्णपणे महिला संचालित असणारे पहिले स्थानक बनले आहे.

  • महिला सशक्तीकरणाअंतर्गत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के.शर्मा यांनी याबाबत निर्णय घेतला या निर्णयानुसार जुलै 2017 माटुंगा रेल्वे स्थानकात 41 महिला कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये 17 बुकिंग क्लार्क, 6 रेल्वे सुरक्षा बल, 8 तिकीट चेकर, 5 पॉइंट कर्मी, 2 उदघोषक तथा 2 सफाई कर्मचारी या सर्वजणी स्टेशन प्रबंधक ममता कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. कुलकर्णी या 1992 सालापासून मध्ये रेल्वेच्या मुंबई मंडळातील पहिल्या सहायक स्टेशन प्रबंधक आहेत.