लग्नसराईवर GST चे सावट

  • विवाहसोहळ्याशी निगडीत व्यवसायांवर परिणाम होणार-असोचेम

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2017/Avirat Vaatchal.com

दिवाळी संपली असून आता विवाहेच्छुकांना लग्नाचे वेध लागले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून लग्न सराईचा मोसम सुरू होणार आहे.  मात्र या लग्नसराईवर नोटाबंदी तसेच GST चे काहीसे सावट असून विवाह सोहळ्याशी संबंधित व्यवसायावर सुमारे 12 ते 15 टक्के परिणाम होण्याची शक्यता औद्योगिक संघटना असोचेमने व्यक्त केली आहे. marriage and gst

  • विवाह सोहळ्यासाठी लागणारी मैदाने, हॉलचे बूकींग, तंबू, खानपान तसेच मिठाई सेवा पुरविणारे उद्योग, फोटोग्राफी आदी सेवा GST मुळे महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सेवांवर सुमारे 18 ते 28 टक्के इतका GST लागू आहे. आतापर्यंत लग्न समारंभासाठी लागणारी मैदान, हॉल बूकींग,तंबू, खानपान सेवा आदींसाठी साधी बिले दिली जात होती. त्यामुळे अनेकदा टॅक्स भरला जात नसे. मात्र आता GST लागू झाल्यापासून या सेवांसाठी पक्के बिल आणि GST बंधनकारक असल्यामुळे विवाह सोहळे करणाऱ्यांच्या खर्चातही वाढ होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

  • 500 रुपयांवरील सर्व प्रकारच्या पादत्राणांवर 18 टक्के कर आहे. सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर 1.6 ते 3 टक्के कर आहे. पंचतारांकीत हॉटेलच्या बुकींगवर 28 टक्के अतिरिक्त GST लागू होणार आहे. याशिवाय इव्हेंट मॅनेजमेंट सेवा देणाऱ्यांनाही 18 टक्के अतिरिक्त GST भरावा लागणार आहे. लग्नसोहळ्यासाठी लागणारा हॉल किंवा गार्डनच्या बुकींगवरही 18 टक्के तसेच इतर सेवांसाठीही अशाचपद्धतीने कर भरावा लागणार असल्यामुळे लग्नखर्चात वाढ अपेक्षित आहे.

 

  • भारतात महागड्या लग्नसमारंभासाठी गोव्यातील बीच, राजस्तानमधील महाल आणि किल्ले यांना अधिक पसंती असते. याशिवाय बाली तसेच दुबईमध्येही शानदार लग्न करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात, असेही असोचेमने म्हटले आहे. 

भारतीय समाज व्यवस्थेतही विवाह सोहळ्याला महत्वाचे स्थान आहे. सध्या भारतातील विवाहाशी संबंधित उद्योग 1 ट्रिलियन रुपये इतका आहे. वर्षाला हा उद्योग 25 ते 30 टकक्यांनी वाढत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी प्रत्येकजण विवाह सोहळा जास्तीत जास्त आकर्षक करण्यावर भर देत असतो. मध्यमवर्गीय कुटुंबही आपल्या घरातील विवाह सोहळ्यासाठी साधारणपणे अडीच ते तीन लाख खर्च करतात. हा खर्च आर्थिक कुवतीनुसार 8 ते 10 कोटींच्या घरात किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतो. त्यामुळे महागड्या लग्न सोहळ्यांना GST चा परिणाम जाणवणार नसला तरी आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्यांवर  GST मुळे परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.