काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती सुरु

नवी मुंबई, 9 एप्रिल 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवारांच्या निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पनवेल महापालिकेसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालयात गर्दी केली आहे.

मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, महेंद्र घरत, माणिकराव जगताप, रमाकांत म्हात्रे आदी काँग्रेस पदाधिकारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.

महापालिका झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे सुशिक्षित आणि चांगले उमेदवार देण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यामुळे उमेदवार निवड करताना त्याचे शिक्षण, सामाजिक काम आदींचा प्राधान्याने विचार करण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सध्या देशात आणि राज्यात भाजपची हवा आहे. मात्र संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष पुन्हा सक्रीय झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेससह इतर पक्षांनी युती सरकारची कोंडी केली आहे. त्याचा परिणाम पनवेल महापालिका निवडणुकीतही दिसून येईल, असे जाणकारांचे मत आहे. मात्र भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी काँग्रेससह इतर पक्ष कोणती रणनिती आखणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष आहे.

panvel congress1