सरकारची विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ?

  • काँग्रेसचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई,25 जानेवारी 2017/अविरत वाटचाल न्यूज

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी आज पत्रकार परिषद सुरु असताना पोलीस विभागाचे दोन कर्मचारी ( स्पेशल ब्रँच ) हजर असल्याचे आढळून आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने मुंबईचे पोलीस आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधून याबाबत विचारणा केली. तेव्हा अशाप्रकारची कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितल्याचे विखे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, ही बाब अत्यंत गंभीर असून काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे. सरकार विरोधी पक्षावर गुप्तपद्धतीने पाळत ठेवत असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.