प्रजासत्ताक दिनी भाजपाच्या तिरंगा एकता यात्रा

  • राज्यभरात 300 ठिकाणी यात्रा काढणार- दानवे

मुंबई, 25 जानेवारी 2018/ avirat vaatchal news:

वेगवेगळ्या झेंड्यांखालील विविध समुदायांना  तिरंग्याखाली एकत्र आणून सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 26 जानेवारी रोजी राज्यभर तिरंगा एकता यात्रा काढणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले. मुंबईतील तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होतील.

भाजपासाठी सामाजिक समता सर्वात महत्त्वाची असून संविधान हाच धर्म आहे. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने गावागावात भाजपाचा हा विचार पोहचविण्यात येईल. राज्यभरात तीनशे ठिकाणी या यात्रा काढण्यात येतील. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते यात्रांसाठी पुढाकार घेतील. या बाईक रॅली असतील. पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व इतर सर्व लोकप्रतिनिधी यात्रांमध्ये सक्रीय सहभागी होतील. नियोजनानुसार राज्यात 2399 ठिकाणी ध्जजवंदन करण्यात येईल व घटनेच्या उद्देशिकेचे (प्रिअँबल) वाचन करण्यात येईल. या उपक्रमात शहिद परिवार व सैनिक परिवार सहभागी होणार असून सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दानवे यांनी केले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत क्वचितच कधी झेंडावंदन झाले आहे अशी आदिवासी गावे निश्चित करण्यात आली असून तेथे आवर्जून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यावर भाजपाचा भर असेल. तसेच मुंबईत 1992 साली बॉम्बस्फोट झालेल्या 12 स्थानांवरही ध्वजारोहण करण्यात येईल, असे दानवे यांनी सांगितले.

मुंबईतील तिरंगा यात्रा

भारतीय जनता युवा मोर्चाच्या मुंबई विभागातर्फे मुंबईत एका भव्या अशा तिरंगा एकता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भाजपा अध्ययक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्यानमार्गदर्शनाखाली भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी या तिरंगा यात्रेचे योग्य नियोजन केले आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी २ वाजता दादरच्या चैत्यहभूमी येथे जाऊन भारतरत्न  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या तिरंगा यात्रेची सुरूवात होणार आहे. पुढे शिवाजी पार्कला वळसा घालून ही यात्रा माटुंगा रेल्वेस्थानक, डी.जी. रूपारेल महाविद्यालयाजवळून सेनापती बापट मार्गावरून दादर रेल्वेस स्टेपशन, फुल मार्केटवरून हुतात्मा  बाबू गेनू क्रिडांगण म्हणजेच कामगार क्रिडा मैदान एल्फिन्स्टन येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी यात्रेचे संविधानसन्मान सभेत रुपांतर होणार आहे. या ठिकाणी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस सभेला संबोधित करणार आहेत.