जून महिन्यात हिवतापविरोधी मोहीम

नवी मुंबई, 29 मे 2017/AV News Bureau:

पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. त्यामुळे  आरोग्य विभागामार्फत हिवतापाच्या नियंत्रणासाठी जून महिन्यात हिवताप विरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे.

थोडयाच दिवसात पावसास सुरुवात होईल. पावसाळ्यात पाण्याचे मोठ्याप्रमाणात डबके तयार होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या इत्यादी आजारामध्ये वाढ होते. सदर वाढ रोखण्यासाठी  जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन त्यांच्या सहभागाने डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे.

आरोग्य सेवक/सेविका, आशा कार्यकर्ती आपल्या घरी चौकशीसाठी आल्यास त्यांना सहकार्य करा. ताप रुग्णांबाबत सत्य माहिती  सांगा.  सर्व ताप रुग्णांची रक्त तपासणी आरोग्य सेवक/ सेविका, आशा कार्यकर्ती यांच्याकडून करुन घ्यावी. हिवतापाचे निदान झाले असल्यास आरोग्य सेवक/सेविका यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार पूर्णपणे घ्या.

पावसाळ्यात घ्यावयाची खबरदारी

  • तुंबलेली गटारे वाहती करावीत, फुटलेले टायर, प्लॅास्टीकच्या बाटल्या, नारळाच्या करवंटया इत्यादी नष्ट करा.
  • पाण्याचे जे साठे नष्ट करता येणार नाहीत तेथे टेमीफॉस अळीनाशक अथवा रॉकेलचा वापर करावा.
  • रिकामा हौद अथवा सांडपाण्याची टाकी असल्यास अळी भक्षक गप्पीमासे सोडा. हे मासे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र/ आरोग्यकर्मचाऱ्यांकडे मोफत उपलब्ध आहेत व डासोत्पत्ती स्थानामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सोडले जातात. त्यासाठी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
  • आठवडयातील एका दिवस कोरडा दिवस साजराकरा या दिवशी घरातील  सर्व पाण्याचे साठे रिकामे करा.
  • भांडी शक्यतो स्वच्छ व कोरडी करा, त्यामुळे किटकजन्यआजारांचा प्रादुर्भाव होणार नाही
  • आवश्यक पाण्याचे साठे पक्या झाकणाने झाकुन ठेवा, कारण या पाण्यांत डास अंडी घालतात. अंडी व अळ्या नष्ट झाल्यामुळे डासांची पैदास होणार नाही.
  • डबकी बुजवा आणि डासांची पैदास थांबवा.
  • मच्छरदाणीचा नियमित उपयोग करा.
  • प्रत्येक व्यक्तीने डासांपासून संरक्षणासाठी पूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे वापरणे व कॉईल, वडी व डासप्रतिरोधक क्रिमचा वापर करावा.
  • घराची दारे खिडक्या सकाळी व सायंकाळी बंद ठेवा जेणेकरुन डास घरांत प्रवेश करु शकणार नाहीत.