सफाई कामगारांच्या सेवाभावी कार्याला सलाम

  • शहरातील मुख्य 6 चौकात सफाई कामगारांची छायाचित्रे असणारी होर्डींग

नवी मुंबई, 29 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

सध्या देशात स्वच्छ भारत अभियानाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या स्वच्छ अभियानाचा खरा शिल्पकार असणाऱ्या सफाई कामगारांच्या कामाला सलाम करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मुख्य 6 चौकात सफाई कामगारांची छायाचित्रे असणारे होर्डींग लावले आहे. या होर्डींगवरील “आपले खरे स्वच्छता रक्षक ! सलाम सफाई कामगार !! जे दररोज निर्माण होणा-या कचरा आणि दुर्गंधीपासून आपले रक्षण करतात” असा संदेशही देण्यात आला आहे.

 

नवी मुंबई महानगरपालिका सन 2002 मध्ये महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानापासून महाराष्ट्र राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवत असून मागील वर्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2017 मध्येही महाराष्ट्र राज्यासह देशाच्या पश्चिम विभागात नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वप्रथम क्रमांकाचे व देशात आठव्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त केलेले आहे.

 

या सर्व बक्षिसपात्र वाटचालीत दररोज शहर स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांचे योगदान शंभर टक्के आहे. त्यांच्या सेवाभावी कामाची दखल घेत नवी मुंबईत मुख्य 6 चौकात सफाई कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यात आला आहे.

 

दरम्यान,एकीकडे स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आखले जात आहेत. तर दुसरीकडे ज्यांच्या खांद्यावर हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आहे, त्या सफाई कामगारांच्या आरोग्याचे तसेच त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. नाहीतर सफाई कामगारांअभावी स्वच्छता अभियान केवळ कागदावरच राहील हे नक्की.