राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारबाबत युपीएची 22 जूनला बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई 19जून 2017/AV News Bureau:

रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर आता युपीएनेदेखील आपल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. युपीएकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी येत्या 22 जून रोजी नवी दिल्लीत युपीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची नवी दिल्लीत घोषणा केली. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर एनडीएच्या घटक पक्षांनी शिक्कामोर्तब केल्याचे शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोविंद यांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेस तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही कळविण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.

एनडीएने आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे युपीए आघाडीकडून राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण? हे ठरविण्यासाठी 22 जून रोजी सायं 4 वाजता दिल्ली येथे युपीएच्या घटक पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये चर्चा होऊन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला कुठल्या पध्दतीने सामोरे जायचे या संबधीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी कळविले आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपदाची निवड एकमताने व्हावी यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यासाठी शाह यांनी मुंबईत येवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर आपण निर्णय कळवू असे ठाकरे यांनी सांगितल्याचे कळते. यापार्श्वभूमीवर युपीएदेखील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणार की एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे लवकरच स्पष्ट होईल.