15,16 फेब्रुवारीला नवी मुंबई महापौर चषक ॲथलेटिक्स स्पर्धा

नवी मुंबई, 14 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 15 व 16 फेब्रुवारीला ‘नवी मुंबई महापौर चषक ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सीबीडी बेलापूर, सेक्टर 3 मध्ये भारतरत्न स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल येथे या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये 6, 8, 10, 12, 14 व 16 वर्षाआतील वयोगटातील (मुले व मुली स्वतंत्र गट) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शिकत असलेले खेळाडू सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे पुरुष व महिला खुल्या गटामध्ये नवी मुंबईसह ठाणे जिल्हयातील खेळाडू सहभागी होऊ शकतात.

 

स्पर्धेमधील विजेत्यांना 2 लक्ष 50 हजार इतक्या रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता  तसेच बक्षिस समारंभ 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विशाल डोळस व उपसभापती  रमेश डोळे आणि समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.