पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मीतीला मंजुरी

अविरत वाटचाल न्यूज/ नवी मुंबई, 10 एप्रिल 2018:

पिंपरी चिंचवड व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 2 हजार 633 नवीन पदांच्या निर्मितीस आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षण संस्था, वाहने यामध्ये वाढ होत असल्याने सध्याच्या यंत्रणेवर ताण येत होता. त्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक परिणामकारकपणे राखता यावी म्हणून पुणे शहर पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली राहणाऱ्या या नवीन पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये दोन परिमंडळे आणि एकूण 15 पोलीस ठाणी समाविष्ट होणार आहेत. नवीन आयुक्तालयासाठी एकूण 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे शहर पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरुन 2 हजार 207 पदे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित 2 हजार 633 पदांची निर्मिती तीन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. यापैकी पहिल्या टप्प्यात 1 हजार 568, दुसऱ्या टप्प्यात 552 तर तिसऱ्या टप्प्यात 513 पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आयुक्तालयाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या आवर्ती आणि अनावर्ती खर्चासदेखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.