चक्रीवादळ ‘फनी’ ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकले

  • किनारपट्टीवर जोरदार वारे आणि पाऊस
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
3 मे 2019:

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ ‘फनी’ ओदिशाच्या दिशेने सरकत असून आज सकाळी  आठच्या सुमारास किनारपट्टीवर धडकले. या भागात 145 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. या वादळामुळे प्रभावित होणा-या 11 लाख लोकांना ओदिशा सरकारने सुरक्षित स्थळी हलवले आहे.

या किनारपट्टीवरील पुरीच्या आसपासच्या भागात वाहणा-या वा-याचा वेग 180-200 किलोमीटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ओदिशातल्या 14 जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. पुरी, भुवनेश्वरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पुरीमध्ये जोरदार वा-यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. सखीगोपाल भागात एका इसमाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपुर या भागात काल रात्रभरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची 81 पथके तैनात करण्यात आली आहेत. ओदिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांत 50 पथके यापूर्वीच सज्ज करण्यात आली आहेत. 100 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या किनारी तसेच अंतर्गत भागात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाम-मेघालयात 4 आणि 5 मे रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्यातर्फेही वेळोवेळी याबाबत माहिती प्रसारीत केली जात आहे.

 


इतर बातम्यांचाही मागोवा