गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार सिंधुदुर्ग विमानतळ

हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून विमानतळाच्या कामाचा आढावा

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 1 मे 2018:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे-चिपी इथे होत असलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे काम येत्या सप्टेंबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला. महाराष्ट्राला या वर्षात नवा विमानतळ मिळणार आहे. देशातल्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी हा विमानतळ असला तरी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या प्रवाशांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी हा विमानतळ सज्ज ठेवण्यात येणार आहे.

एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विमानतळासाठी 2009 मध्ये करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी ‘आरेखन-बांधा-वित्त पुरवठा- कार्यान्वयन-हस्तांतरण’ या तत्वावर आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हा विमानतळ बांधत आहे. कोकण, गोव्याचा भाग, उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दळणवळणासाठी हे विमानतळ महत्वाचे ठरणार आहे.

या विमानतळाच्या बांधकामासाठी सुमारे 520 कोटी रुपयांचा खर्च

विमानतळासाठी 2500 मीटरची धावपट्टी

वर्दळीच्या तासाला 400  प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता

केवळ सुविधांचा विस्तार केल्यास जवळपास 800 प्रवाशांची  ने-आण करण्याची विमानतळाची क्षमता असणार आहे.

प्रवासी टर्मिनल इमारत, हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा, तांत्रिक बाबीसाठीची इमारत यांचे बांधकाम सुरू असून इतर इमारतींचे बांधकामही वेळेवर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.