नवी मुंबईत प्रथमच महिला क्रिकेट निवड चाचणी

  • दर्जेदार खेळाडू घडविण्याचा क्रिडा उपायुक्त काळेंचा निर्धार

अविरत वाटचाल

नवी मुंबई,16 मे 2018:

बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 16 आणि 17 मे रोजी प्रथमच नवी मुंबईत महिला क्रिकेट निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचणी सामन्यांचे उद्घाटन आमदार संदीप नाईक यांच्याहस्ते आणि क्रीडा उपायुक्त नितीन काळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी क्रीडा आणि सास्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती विशाल डोळस, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे परिक्षक म्हणून रमाकांत आचरेकर यांच्या कन्या विशाखा दळवी आणि कल्पना मुरकर उपस्थित होत्या.

मुंबई कार्यक्षेत्रात अशाप्रकारची एकूण 16 निवड चाचणी केंद्र असून त्यापैकी 4 सामने नवी मुंबईमध्ये होत आहेत. हे सामने 20 षटकाचे असून त्यांचे साखळी पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. एकूण सहा सामने नवी मुंबई करांना पाहण्याची संधी मिळाली आहे.

  • यावेळी बोलताना आमदार संदीप नाईक म्हणाले की, इतर खेळ प्रकाराचे जास्तीत जास्त खेळाडू नवी मुंबई शहरात घडावेत आणि त्यांनी नवी मुंबईचे नाव उज्वल करावे, अशी आशा व्यक्त केली. तसेच त्याकरिता लागणाऱ्या खेळविषयक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
  • क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती विशाल डोळस यांनी सांगितले की, प्रत्येक सिझनमध्ये अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, जेणेकरून नवी मुंबई महिला क्रिकेटला वेगळे स्वरुप आणि महत्व प्राप्त होईल.तसेच पुढील काळात महापौर चषक अंतर्गत महिला क्रिकेट स्पर्धांचा समावेश करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
  • क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांनी सांगितले की, नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात असणाऱ्या विविध खेळांच्या मैदानांचा उपयोग उदयोन्मुख स्थानिक खेळाडूंकरीता करण्यात येईल तसेच विविध खेळप्रकारात दर्जेदार खेळाडू घडविण्याचा मानस व्यक्त केला. उदयोन्मुख खेळाडू तयार करण्यासाठी लागणारी सर्व साधने उपलब्ध करून देण्यासाठई महापालिकेचा क्रीडा विभाग नक्कीच पुढाकार घेईल, अशी ग्वाही काळे यांनी यावेळी दिली.