नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 36 कोपरखैरणे संघाची लक्षवेधी कामगिरी

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात उपविजेपद पटाकाविले

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23 जुलै 2023

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने 15 जुलै 2023 पासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 36, कोपरखैरणेगांवच्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने पूर्वीपासून दबदबा असणा-या खाजगी शाळांच्या संघांवर मात करीत थेट अंतिम फेरी गाठून सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले.

अंतिम सामन्यात जरी ख्राईस्ट अकॅडमी संघाविरोधात त्यांना पराभव स्विकारावा लागला तरी यापूर्वी कोणताही अनुभव नसताना पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत अनेक शाळांच्या मातब्बर संघांवर स्पर्धेतील सामन्यांत मात करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील मुलींनी संपादन केलेले हे यश लक्षवेधी आहे. मुलींच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी संपूर्ण संघाचे व त्यांच्या प्रशिक्षक, शिक्षकांचे कौतुक केले आहे.

 या स्पर्धेत 17 वर्षाआतील मुलींच्या गटात 24 शाळांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये नमुंमपा शाळा क्र, 36, कोपरखैरणेगाव या संघाने पहिल्या सामन्यापासूनच उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले. स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात विबग्योर हायस्कुल, ऐरोली या मातब्बर संघाचा 4-0 गोलने पराभव केला तर दुस-या सामन्यात गोल्ड क्राईस्ट हायस्कुल, वाशी संघावर 3-0 ने मात दिली. पुढे उपांत्य फेरीत रिलायन्स फाऊंडेशन, स्कुल यांच्याशी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात महापालिकेच्या मुलींनी सुरेख ताळमेळ राखत सांघिक भावनेचे मैदानात प्रदर्शन करीत 1-0 ने विजय संपादन केला व अंतिम फेरीत मजल मारली.

या संपूर्ण स्पर्धेत गेली अनेक वर्षे फुटबॉल खेळात अधिराज्य गाजवणा-या शाळा, ज्यांच्याकडे सातत्याने सराव करून घेणा-या उत्तम प्रशिक्षकांची फौज आहे, अशा मातब्बर शाळांना मात देत महानगरपालिकेच्या शाळांसुध्दा गुणवत्तेत कुठे कमी नाहीत याची नोंद घ्यायला कोपरखैरणेगाव शाळेतील मुलींच्या संघाने भाग पाडले.

या स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.36, कोपरखैरणे आणि क्राईस्ट अकॅडमी, कोपरखैरणे या मुलींच्या संघांमध्ये झाला. गेली दोन वर्षे सातत्याने विजेता होऊन मुंबई विभागात सुध्दा विजय संपादन केलेल्या क्राईस्ट अकॅडमी संघातील राष्ट्रीय स्तरावर खेळणा-या खेळाडू मुली आणि त्यांच्याकडील असलेला अनुभव या जोरावर क्राईस्ट अकॅडमीच्या संघाने अंतिम सामन्यात 5-0 गोलने सामना जिंकला व ते या गटाचे विजेते ठरले. तथापि चर्चा होत राहिली ती पहिल्यांदाच स्पर्धेत खेळूनही चार नामांकित शाळांचा पराभव करून अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेल्या नमुंमपा शाळा क्र. 36, कोपरखैरणे गांव संघाचीच.

 या संघातील खेळाडू राबिया शेख, समृद्धी सोनावणे, ऋतुजा संकपाळ, किरण सूर्यवंशी, पूजा जाधव, प्रतीक्षा शिराळे, पूर्वा नवघणे, सोनाली कांबळे, सिद्धी लोहार, धनश्री महाजन, आचल ताजणे,तनुजा धुमाळ, श्वेता कंक , सेजल कंक, जगदेवी चिन्नाराठोड, करिश्मा चव्हाण, श्रावणी आगळे, समीक्षा रेणुसे, सरला झनकर यांचे सर्वांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

 गुणवत्तेच्या बाबत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील मुले अत्यंत प्रतिभावान असून त्यांना आपल्या क्षमता सिध्द करण्याची संधी उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी नेहमीच त्याचे दर्शन घडविलेले दिसून येते. मागिल काही वर्षांपासून नमुंमपा क्रीडा विभागाच्या वतीने महानगरपालिकेच्या शाळेत शिकणा-या गुणवंत खेळाडूंचा शोध घेऊन, त्यांच्या आवडीच्या खेळात असलेले त्यांचे कौशल्य लक्षात घेत त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच उत्कृष्ट प्रशिक्षकांमार्फत तंत्रशुध्द प्रशिक्षण व मैदाने आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचीच परिणिती या विजयी कामगिरीतून दिसून येत असून महानगरपालिका शाळांतून स्पर्धेत सहभागी सर्वच खेळाडूंचे आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी कौतुक केले आहे तसेच अंतिम विजयी ठरलेल्या क्राईस्ट अकॅडमी संघास विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

========================================================

========================================================