घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई सर्वोत्तम शहर

  • “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2018”  अंतर्गत पुरस्कार

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 23 जून 2018:

“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2018” मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर पुरस्कार आज इंदौर येथे ब्रिलीयन्ट कन्वेन्शन सेंटर येथे झालेल्या विशेष समारंभात केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याहस्ते, गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाचे केंद्रीय सचिव  दुर्गाशंकर मिश्रा, स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही.के. जिंदाल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

  • नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी हा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  रमेश चव्हाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे व दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होते.

 

  • दररोज घरात निर्माण होणा-या कच-याचे ओला व सुका असे घरातच वर्गीकरण करून कचरा गाड्यांमध्ये वेगवेगळा देण्याचे 85 टक्के इतके प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. हा वर्गीकरण केलेला साधारणत: 750 मेट्रीक टन कचरा नियमितपणे तुर्भे येथील पर्यावरणशील शास्त्रोक्त भू-भरणा पध्दतीवर आधारीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी योग्य प्रकारे वाहून नेऊन त्यावर खत व प्लास्टिक ग्रॅन्युल्स तसेच फ्युएल पॅलेटस् निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.

 

  • घनकचरा व्यवस्थापन नियमाचे पालन करीत दररोज 100 किलोपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स, संस्था यांनी त्यांच्यामार्फत निर्माण केल्या जाणा-या ओल्या कच-यावर त्यांच्या आवारातच प्रकल्प राबवून प्रक्रिया करणे अनिवार्य असल्याने  अनेक मोठ्या सोसायट्या, हॉटेल्स, शिक्षण संस्था, उद्योग समूह यांनी आपल्या आवारातच ओल्या कच-यापासून खत प्रकल्प कार्यान्वित केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा तसेच उद्यानांमध्येही खत प्रकल्प सुरू करण्यात आले. 

 

  • कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आर.एफ.आय.डी. तंत्रप्रणाली कार्यान्वित असून ही तंत्रप्रणाली वापरणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. याव्दारे कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला किंवा नाही याची खातरजमा महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत केली जात आहे. त्याचप्रमाणे कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनांचे GPS व GPRS प्रणालीव्दारे नियंत्रण केले जात आहे. अशाप्रकारे कचरा संकलन व कचरा वाहतुक या दोन्ही बाबींवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणे महानगरपालिकेस शक्य होत आहे.

 

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात नवी मुंबई देशात सर्वोत्तम असल्याचा केंद्रीय पुरस्कार सर्व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा असल्याचे सांगत ही स्वच्छतेची सवय कायमस्वरुपी रहावी याकरिता स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी “शून्य कचरा” संकल्पना राबवून आपल्याकडून कमीत कमी कचरा निर्माण होईल याची काळजी घ्यावी व आपण निर्माण करीत असलेल्या ओल्या कच-याची घरातच खत टोपलीव्दारे तसेच मोठ्या प्रमाणातील कच-याची आपल्या सोसायटीच्या, हॉटेल्सच्या, संस्थेच्या, उद्योगसमुहाच्या आवारातच खत निर्मिती प्रकल्प राबवून विल्हेवाट लावावी आणि आपण निर्माण करीत असलेला कचरा अतिशय कमी प्रमाणात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी जाईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे आवाहन यानिमित्ताने केले आहे.

 

 

==========================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा…

  • न्हावा शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड