नवी मुंबईत 317 पैकी 208 गणेश मंडळांना परवानगी

  • गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज
  • 23 विसर्जनंस्थळांवर 670 स्वयंसेवक तैनात करणार 

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 12 सप्टेंबर 2018:

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळात  सार्वजनिक व घरगुती स्वरूपात अत्यंत उत्साहाने  साजरा होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आएहे. शहरातील सर्व 23 विसर्जनस्थळांवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रथमोपचार कक्षांसह सुमारे 670 स्वयंसेवक याकाळात सदैव तयार ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील यांनी दिली.

श्रीगणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप परवानगी मिळणेकरिता कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता अभिनव ऑनलाईन प्रणाली दोन महिने आधीपासूनच सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका, पोलीस, वाहतुक पोलीस, अग्निशमन अशा सर्व विभागांच्या परवानग्या एकाच अर्जाव्दारे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शहरातील तब्बल 317 मंडळांनी ऑनलाइन परवानगीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 208 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगी देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी दिली.

 

विभागनिहाय गणेशोत्सव मंडळाची यादी

नवी मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या देण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरु केली आहे. यंदा सुमारे 317 अर्ज आले. त्यापैकी 208 गणेशमंडळांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. तर साधारणपणे 109 अर्ज नामंजूर झाल्याची माहिती महापालिका उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.

 

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या भूमिकेतून यावर्षी पर्यावरणपूरक (Eco-Friendly) गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना प्रोत्साहन देण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले असून पारंपारिक ‘नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धे’मध्येही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यावर्षी विशेष श्रीगणेशोत्सव ‘स्वच्छता स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले असून स्वच्छता पूरक बाबींमध्ये लक्षणीय देखावे व उपक्रम राबविणा-या तसेच जनजागृतीपर काम करणा-या मंडळांना विभाग स्तरावर प्रथम व व्दितीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली, शहर अभियंता मोहन डगांवकर, परिमंडळ १ उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २ उपआयुक्त अमरिश पटनिगेरे तसेच संबंधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जनस्थळांवर विसर्जनाच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मूर्ती विसर्जनासाठी तलावांच्या ठिकाणी स्वयंसेवक

विसर्जन स्थळांमध्ये बेलापूर विभागात 5, नेरूळ विभागात 2, वाशी विभागात 2, तुर्भे विभागात 3, कोपरखैरणे विभागात 3, घणसोली विभागात 4, ऐरोली विभागात 3, दिघा विभागात 1 अशा एकूण २३ विसर्जनस्थळांवर श्रीमुर्तींच्या विसर्जनकरीता तराफ्यांची व आकाराने मोठ्या मुर्ती विसर्जित होणा-या तलावांठिकाणी क्रेन / ट्रॉलीची सुविधा करण्यात आली आहे. त्याठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्डस् तैनात असणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर आवश्यक ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींगही करण्यात आले  आहे.

तलावांमध्ये गॅबियन वॉल

‘तलाव व्हिजन’ अंतर्गत मुख्य १४ तलावांमध्ये करण्यात आलेल्या इटालियन गॅबियन वॉलच्या रचनेव्दारे श्रीमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी विशिष्ट जागा निर्माण करण्यात आलेली आहे. भाविकांनी व श्रीगणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे याच ठिकाणी श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करावे व पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या याही वर्षी करण्यात येत आहे.

जमा होणारी फळे गरजूंना देणार

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रसाद साहित्य व फळे गरजू मुले व नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे याची नोंद घेत भाविकांनी आपल्याकडील अधिकची फळे व प्रसाद साहित्य विसर्जनस्थळांवरील या विशिष्ट ठिकाणी ठेवावे असे आवाहन आहे.

पोलीस यंत्रणा दक्ष

महापालिकेप्रमाणेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस यंत्रणा दक्षतेने कार्यरत असणार आहे. ध्वनी प्रदूषण विषयक विहित मर्यादा पातळीची मर्यादा सांभाळायची असून नागरिकांनी इतरांना त्रास होणार नाही इतकीच विहित मर्यादेत ध्वनीपातळी ठेवायची आहे. भाविक भक्तजनांनी श्रीगणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी आपल्याकडील मौल्यवान वस्तू व लहान मुले यांची काळजी घ्यावी तसेच वैयक्तिक व सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

=========================================================================================================================

 

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा -शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड