सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार

  •  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 5 डिसेंबर २०१९ :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच मुंबई 2030 अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी सर्वांसाठी घरे मिळावीत, यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्यासंदर्भात तसेच परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियमांमध्ये शिथिलता आणणे आदी विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आज झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या आवश्यक प्रकल्पांसाठी आर्थिक स्वावलंबन, बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी तयारी, पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी टनेल बांधणे, नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात महापालिकेने केलेली कार्यवाही, बेस्टची व्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यासंदर्भातील कार्यवाही, आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच गारगाई धरण प्रकल्प, मुंबई मलनिःस्सारण प्रकल्प, मुंबई किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, बेस्टच्या अर्थसहाय्यासाठी विद्युत निर्मिती प्रकल्प या पालिकेच्या नियोजित प्रकल्पांबद्दलही यावेळी चर्चा झाली. 

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. तसेच परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी प्राधिकरण, महापालिका, म्हाडा, नगर विकास अशा विविध यंत्रणा काम करत आहेत. याऐवजी मुंबईसाठी एकच प्राधिकरण करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. मुंबईच्या जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जुने पाईपलाईन बदलण्याची गरज आहे. स्ट्रिट फर्निशिंग अंतर्गत मुंबईतील रस्त्यांवरील चिन्हेही एकसमान असावीत. तसेच रस्त्यांची, मंडईची रचना एकसमान करता येईल का याबद्दलही विचार करण्यात यावा.

पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गाच्या उड्डाण पुलाखालील जागांची स्वच्छता करण्यात यावी. याठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारावीत अथवा त्या जागांचे सौंदर्यीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्या. पर्यटन वाढीसाठी विविध उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली.

मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना यावेळी केली.

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा