एक देश एक निवडणूक

१५ जानेवारी २०२४ पर्यंत नागरिकांकडून सूचना मागविल्या

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 7 जानेवारी 2024

देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर नागरिकांची मते मागविली आहेत. या समितीने याबाबत एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली असून त्यानुसार १५ जानेवारी २०२४ पर्यंत नागरिकांनी त्यांची मते, सूचना पाठवायच्या आहेत. देशभरातून येणाऱ्या सूचना, प्रस्तावांवर सखोल चर्चा करून मग एक देश एक निवडणुकीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

भारत सरकारने दिनांकित २ सप्टेंबर, २०२३ राजपत्र अधिसूचना क्र. २११ द्वारा (https://onoe.gov.in/onoe-gazette-notification) “उच्चस्तरीय समिती – एक देश, एक निवडणूक” स्थापन केली आहे. संदर्भाच्या शर्तीनुसार समितीस ईव्हीएम’ज/ व्हीव्हीपीएटी’ज इ. सारखे लॉजिस्टिक्स, सामायिक इलेक्टोरल रोल्सची तयारी, संविधान व संबंधित निवडणूक कायद्यांकरिता आवश्यक सुधारणा, कायमस्वरूपी तत्त्वावर एकाच वेळी निवडणुकांचे आयोजन याकरिता योग्य विधि व प्रशासकीय रचनेच्या निर्मितीकरिता शिफारशी करणे आवश्यक आहे.

समितीसंदर्भाच्या शर्तीचा तपशील आणि तज्ज्ञ संस्थांचा अहवाल https://onoe.gov.in/onoe-reports या वेबसाइटवर पाहता येणार आहे. प्रस्ताव देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी विद्यमान कायद्यात वा घटनेतील तरतुदीत बदल करावे लागणार आहेत. त्यासाठीच देशातील नागरिकांकडून त्यांच्या सूचना लेखी स्वरुपात मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून आलेले लेखी प्रस्ताव, सूचना १५ जानेवारी २०२४ पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर या सर्व प्रस्ताव चर्चेसाठी समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत.

नागरिकांनी त्यांच्या सूचना वा प्रस्ताव https://onoe.gov.in यावर पाठविण्यात यावेत किंवा se-hic@gov.in यावर ई-मेल पाठवावेत अथवा उच्चस्तरीय समिती – एक देश, एक निवडणूक जोधपुर ऑफिसर्स हॉस्टेल (ब्लॉक नं. ९), सचिव, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सजवळ, ‘सी’ हेाक्झागॉन (इंडिया गेट सर्कल), नवी दिल्ले-११०००३ या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवावेत, असे नमूद केले आहे.

  • एक देश एक निवडणूक म्हणजे काय ?

सध्या देशातील राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. एक देश एक निवडणूक घेणे म्हणजे देशभरात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेणे. म्हणजे मतदारांना एकाच दिवशी आणि एकाच वेळी विधानसभा तसेच लोकसभेच्या उमेदवारांना मतदान करता येईल.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यायनंतर १९५२,१९५७, १९६२ आणि १९६७  मध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका एकाच वेळी होत होत्या. मात्र १९६८ आणि १९६९ मध्ये अनेक राज्यांमधील विधानसभा मुदतपूर्व विसर्जित केल्या होत्या. त्यानंतर १९७० मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली होती. त्यामुळे एक देश एक निवडणूक पद्धत खंडीत झाली होती.

=======================================

========================================================