भारतात बिबट्यांच्या संख्येत वाढ

देशात 12,852 बिबट्यांची नोंद ,महाराष्ट्रात 1,690 बिबटे 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2020:

भारतात  बिबट्यांची एकूण संख्या 12,852  असून 2014 मधे केलेल्या सर्वेक्षणात ही संख्या 7910 होती. म्हणजेच बिबट्यांची 60 % पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 3,421, 1,783 आणि 1,690 बिबट्यांची संख्या अनुमानित असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

नवी दिल्लीत बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवालाचं प्रकाशन नुकतंच जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.  गेल्या काही वर्षात देशात, वाघ, सिंह आणि बिबट्यांची वाढती संख्या म्हणजे पर्यावरण जतनासाठीच्या प्रयत्नांचे आणि वन्य जीवन आणि जैव विविधता बहरत असल्याचे द्योतक आहे, असेही जावडेकर म्हणाले.

भारतात वाघांसंदर्भात देखरेख ठेवताना परिसंस्थेतल्या वाघांची महत्वाची भूमिका स्पष्ट झाली, त्यातूनच बिबट्या सारख्या इतर करिश्माई प्रजातींवर प्रकाश पडल्याचे मंत्री म्हणाले.

संरक्षित आणि बहु उपयोगी जंगलात हे वाघ आणि बिबट्या आढळतात. बिबट्यांच्या 51,337 छायाचित्रात  एकूण 5,240 प्रौढ बिबटे आढळले आहेत. देशात वाघांच्या पाठोपाठ बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे

बिबट्यांची वस्तीस्थाने असणाऱ्या देशातल्या जंगलातल्या वाघांची गणना झाली मात्र बिगर वन क्षेत्रातली (चहा आणि कॉफीचे मळे जिथे बिबट्याचा वावर मानला जातो) हिमालयावरची उंच स्थाने, ईशान्येकडचा भाग लक्षात घेण्यात आलेला नाही म्हणूनच बिबट्यांची ही संख्या किमान मानली जावी. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण- भारतीय वन्यजीव संस्था इतर विविध प्रजातीबाबत लवकरच अहवाल जारी करणार आहे.