देशातल्या 8 समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2020:

जगभरातल्या स्वच्छ आणि निसर्गसौंदर्य लाभलेल्या समुद्र किना-यांना डेन्मार्क मधील पर्यावरण शिक्षण(FEE) या संस्थेकडून आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट पुरस्कार जाहीर केले जाते. जगभरातल्या पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिना-याची माहिती व्हावी यासाठी किना-यांवर ब्लू फ्लॅग फडकवला जातो. देशातल्या 8 समुद्रकिना-यांना हे सर्टिफिकेट मिळाल्याची घोषणा ऑक्टोबर 2020 मध्ये करण्यात आली होती. अखेर सोमवारी 28 डिसेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या 8 समुद्रकिनाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग आभासी पद्धतीने फडकावला. किनारपट्टी भागातील प्रदूषण नियंत्रणासाठी हे पारितोषिक देण्यात आलं आहे.

ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र हे 33 कडक निकषांवर आधारित “डेन्मार्क मधील पर्यावरण शिक्षण” फाउंडेशनद्वारे मान्यता प्राप्त एक जागतिक स्तरावरील पर्यावरणीय प्रमाणपत्र आहे. भारताचा समावेश आता 50 ब्लू फ्लॅग ठिकाणं असणा-या यादीत करण्यात आला आहे.

नीटनेटके स्वच्छ सागरी किनारे हे किनारपट्टीचे वातावरण चांगले असण्याचे दर्शक असून ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजे भारताच्या संवर्धन आणि शाश्वत विकास प्रयत्नांची जागतिक मान्यता असल्याचं मत जावडेकर यांनी व्यक्त केलं. येत्या 3-4 वर्षांत अशा आणखी शंभर समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मिळेल, पर्यावरण मंत्री पुढे म्हणाले की सागरी स्वच्छता ही केवळ सौंदर्य आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातूनच नव्हे तर सागरी अस्वच्छता कमी करून तटीय वातावरण टिकाऊ बनविण्यासाठी “लोकचळवळ” बनवण्याची गरज आहे.

  • आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग फडकावलेले समुद्र किनारे
  • कप्पड (केरळ), शिवराजपूर (गुजरात), घोघला (दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), ऋषिकोंडा (आंध्र प्रदेश), गोल्डन (ओदिशा) आणि राधानगर (अंदमान निकोबार बेटे ). राज्यमंत्री आणि संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या वरिष्ठ अधिका-यांनी  देखील या समुद्रकिनाऱ्यांवर ध्वज फडकावले.

जून 2018 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी भारताने एकाच वेळी 13 किनारपट्टीवरील राज्यांमधून आय-अँम-सेव्हिंग-माय-बीच ही किनारपट्टी स्वच्छता चळवळ सुरु केली. किनारा पर्यावरण आणि सौंदर्यशास्त्र व्यवस्थापन सेवा कार्यक्रम राबवून किनारपट्टीच्या क्षेत्राच्या शाश्वत विकासाचा प्रवास सुरू केला.

आज, 10 किनारपट्टीच्या राज्यांमध्ये बीईएएमएस कार्यक्रम सुरू झाल्यामुळे या किनारपट्टीवर 500 टन पेक्षा जास्त घनकचऱ्याचे संकलन करून पुनर्प्रक्रिया आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली गेली ज्याद्वारे 78 टक्के सागरी कचरा आणि 83 टक्के प्लास्टिक कचरा कमी होऊन समुद्रकिनार्‍यावरील स्वच्छतेच्या आंतरराष्ट्रीय पातळीत सुधारणा झाली आहे. या कार्यक्रमाद्वारे पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापराने अंदाजे 11000 किलोलीटर पाण्याची बचत झाली ज्यामुळे या समुद्रकिनार्‍यावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये 85 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.