वाशीत 27 डिसेंबरला बाल महोत्सव

नवी मुंबई, 26 डिसेंबर 2016 /AV News Bureau :

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीनं समाज विकास विभागामार्फत तसंच शिक्षण विभागामार्फत 27 डिसेंबरला वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, जादूचे प्रयोग, बालनाट्य अशी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या अनुषंगानं यापूर्वी घेण्यात आलेल्या वेषभुषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटिका स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

सकाळी 10 वाजल्यापासून बालकांच्या उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, ठाणे लोकसभा सदस्य खा.राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य आ.मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आ.संदीप नाईक, विधानपरिषद सदस्य आ.नरेंद्र पाटील, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले आणि महापालिका पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी या महोत्सवाच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या विविध कलागुणदर्शनपर स्पर्धांमध्ये यापूर्वीच सहभाग घेतला आहे.  या बाल महोत्सवामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुलांनी उत्साहाने सहभागी व्हावं, असं आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सायली शिंदे व उपसभापती सुजाता पाटील आणि समिती सदस्यांच्या वतीनं करण्यात येत आहे.