शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ

  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई 4 जून 2018:

केंद्र सरकार कोणतीच अंमलबजावणी करत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.बळीराजा सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. तो कर्जबाजारी झाला आहे.त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी समाजातील सर्व घटकांनी उभे रहावे,असे आवाहन करीत शेतकरी म्हणून आपणही शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देत आहोत, अशी जाहीर भूमिक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली.

चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागोजागी सांगितले की, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के फायदा हा शेतीमालाच्या किमतीचा आधार धरला जाईल आणि त्या पद्धतीने पाऊले टाकली जातील. पण या गोष्टीची अंमलबजावणी गेल्या चार वर्षात झालेली नाही. सरकारने याची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी काही पहिल्यांदाच करत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांत कधी दिल्लीला, कधी दक्षिण भारतात, कधी उत्तर प्रदेशात तर कधी मध्यप्रदेशात तर कधी आपल्या महाराष्ट्रात शेतकरी सातत्याने रस्त्यावर येवून आपली भूमिका मांडत आहेत,  असे पवार म्हणाले.

 माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी दुध रस्त्यावर ओतणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे हा प्रकार टाळता आला तर टाळावा. गरीब वर्गात हा माल वाटावा याने तुम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि सरकारला तुमचा आक्रोश या माध्यमातून दिसेल, गरीबांची सहानुभूती आपल्याला मिळेल. शेतकऱ्यांनी या आंदोलनात सामान्य माणसाला त्रास होईल असे कोणतेही काम करू नये. हा संघर्ष आता प्रश्न सुटेपर्यंत थांबवायचा नाही. राज्य आणि केंद्र सरकारने त्यांचा शब्द पाळला नाही. शब्द पाळण्याची त्यांची नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.