आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार २८ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क परत

 

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

  • मुंबई, 15 मार्च 2021 :

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येतो. या योजनेतून २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना १०० टक्के तर अडीच लाख ते ८ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ८० टक्के रकमेच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती केली जाते. या विद्यार्थ्यांना भराव्या लागलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण  शुल्काइतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कमेची विद्यार्थ्यांना प्रतिपुर्ती केली जाते. त्यामुळे या योजनेतून विविध अभ्यासक्रमानुसार १९ हजार २०० ते २८ हजार ९०० रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळते, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

या योजनेतून लाभासाठी विद्यार्थ्यांना १० मार्च २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.