मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्टया रद्द

  • संभाव्य अतिवृष्टी : शनिवारी, रविवारी कामावर हजर राहण्याचे आदेश

अविरत वाटचाल न्यूज

6 जून 2018:

9 ते 11 जून या काळात कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेकडून वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोणत्याही  आव्हानाशी दोन हात करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली असून आपल्या सर्व अधिकाऱ्यांना येत्या शनिवारी आणि रविवारी कामावर हजर राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. महानगरपालिकेच्या संबंधित खातेप्रमुखांच्या सुटया रद्द करण्यात आल्या असून त्यांना आपआपल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • नौदल, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या अधिका-यांनी विविध विभागातील धोकादायक ठिकांणाची रेकी केलेली आहे.

 

  • महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातील अधिका-यांना सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच, रिफलेक्टिव्ह जॅकेटसह मनुष्यबळ, यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात आल्याची खातरजमा हॉटलाईनवरुन संपर्क साधून करण्यात आली.

 

  • पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिका-यांशी समन्वय साधून मुंबई शहर व उपनगरात पाण्याचा निचरा करण्यासाठी लावण्यात आलेले उदंचन संच डिझेल व मनुष्यळासह कार्यरत राहतील याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व उदंचन चालकांशी संपर्क साधून ते आपआपल्या जागी सतर्क आहेत याची खातरजमा करण्याच्या सूचना मुख्य नियंत्रण कक्षातील उदंचन संच समन्वयकांना देण्यात आल्या आहेत.

 

  • इतर महत्वाचे  नियंत्रण कक्ष जसे की, अग्निशमन निंयंत्रण कक्ष, तटरक्षक दल, दोन्ही रेल्वे   नियंत्रण कक्ष, बीईएसटी नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष यांना वेधशाळेचा इशारा कळवून सतर्क रहाण्याच्या तसेच आपआपली आणीबाणी मदत पथके सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

  • महावितरण, रिलायन्स एनर्जी,बीईएसटी (विद्युत पुरवठा) यांना कुलाबा वेधशाळेचा इशारा कळवून त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात सतर्क रहाण्याच्या तसेच त्यांची आणीबाणी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

  • १४ आणीबाणी मदत यंत्रणांपैकी (Emergency Support Functions) आवश्यक असलेलया यंत्रणांच्या अधिका-यांना सतर्क करण्यात आले असून त्यांना मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात 7 जूनपासून उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

  • २४ विभागातील प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांना आणीबाणी परिस्थिती उध्दभवल्यास नागरिकांच्या तात्पुरत्या  निवा-याकरिता तात्पुरते निवारे (Temporary Shelters) म्हणून घोषित करण्यात आलेल्या महापालिकेच्या शाळा काळजीवाहू कर्मचा-यांसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

  • मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षास कळविण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.

 

  • मुंबईस पाणी पुरवठा करण्यात येणा-या तलावांच्या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्यास व धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे आजुबाजुच्या परिसरास धोका निर्माण होणार असल्यास त्याची माहिती तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षास कळविण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

 

  • भरतीच्या वेळेस फल्ड गेट बंद करण्यात आल्यामुहे पाण्याचा निचरा करण्याकरिता किती पंप प्रत्येक पंपिंग स्टेशनला सुरु करण्यात आले आहेत याची माहिती मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षास कळविण्याच्या सूचना पंपिंग स्टेशनच्या अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.

 

  • मुंबई अग्निशमन दलाची पूर बचाव पथके अग्निशमन दलाच्या सहा प्रादेशिक केंद्रावर आवश्यक त्या साधन सामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

 

  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची प्रत्येकी एक तुकडी शहर भागाकरिता शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्र परळ येथे, पश्चिम उपनगराकरिता अंधेरी क्रिडा संकुल येथे व पूर्व उपनगराकरिता मानखुर्द अग्निशमन केंद्र येथे पूर बचाव साहित्यासह दिनांक ०७.०६.२०१८ पासून तैनात करण्यात आले आहे.

 

  • नौदलाची पथके कुलाबा, वरळी, घाटकोपर,मालाड, ट्रॉम्बे   येथे तैनात ठेवण्यात आले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बृहन्मुंबईतील सहा समुद्रांवर सुरक्षितेच्या दृष्टीने अग्निशमन दल, पोलीस, शहर आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या जवानांना दिनांक ०८.०६.२०१८ पासून तैनात करण्यात येणार आहे.  

 

  • पावसात मोठया प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या २४ विभागांमध्ये उद्यान विभागाच्या कर्मचारी वर्ग वाहने व इतर आवश्यक त्या साहित्यासह २४ तास तैनात करण्यात आला आहे.

 

  • मुख्य नियंत्रण कक्ष, ठाणे व नवीमुंबई महापालिकेच्या हॉट लाईनवरुन दोन्ही नियंत्रण कक्षांच्या अधिका-यांशी समन्वय ठेवण्यात आला तसेच त्यांच्या परिसरातील पावसाची माहिती सुध्दा माहिती घेण्यात येणार आहे.

 

  • Disaster Management MCGM  ऍप व dm.mcgm.gov.in  हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून त्यावर पर्जन्यामानाची, महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

इतर बातम्यांचाही मागोवा…

  • न्हावा शेवा -शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड

 

  • स्पंदना- महिला लघुउद्योजगांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ