नवी मुंबईकरांवर आता 31 विशेष दक्षता पथकांची नजर

कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 मार्च 2021:

नवी मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांकडून कोरोना मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन होत नसल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे कोरोना सुरक्षा नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असून अशाप्रकारे कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. आता मात्र या दंडात्मक कारावायांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी 31 विशेष दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये  5 व्यक्ती अशा 155 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

16 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने 300 चा आकडा पार केला असून मागील तीन ते चार दिवसात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत गेल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीरतेने लक्ष देण्याची असून कोरोना बाधितांच्या संख्येवर नियंत्रणासाठी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक मास्क, सोशल डिस्टन्सींग आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन केले जाणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. याकरिता प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय पोलीसांसह दक्षता पथके नियुक्त करण्यात आली असून त्यांच्यांमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच पोलीसांमार्फतही स्वतंत्ररित्या कारवाई केली जात आहे.

या कारवाया लोकसंख्येच्या मानाने कमी असल्याने याकडे अधिक बारकाईने लक्ष केंद्रीत करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्येक पथकात 5 व्यक्ती अशा 155 जणांची 31 विशेष दक्षता पथके कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पथक निर्मिती कार्यवाहीला तातडीने सुरूवात करण्यात आलेली आहे. ही विशेष पथके संपूर्ण महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींवर करडी नजर ठेवणार आहेत.

प्रत्येक पथकामध्ये 5 व्यक्ती असे या विशेष दक्षता पथकाचे स्वरूप राहणार असून प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात सकाळच्या सत्रासाठी 1 व रात्रीच्या सत्रासाठा 1 अशी 2 पथके कार्यान्वित असणार आहेत.

विभाग कार्यालय क्षेत्रासाठी नियुक्त पथकांव्दारे लग्न व इतर समारंभ तसेच वर्दळीची ठिकाणे येथे कोरोना नियमांचे पालन होते की नाही यावर बारीक लक्ष ठेवले जाणार असून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्तांनी तातडीने ही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.

एपीएमसी मार्केटमध्ये 15 पथके

याशिवाय कोरोना प्रसाराचा सर्वाधिक धोका असणा-या एपीएमसी मार्केट क्षेत्रासाठी प्रत्येक पथकात 5 व्यक्ती अशी 5 पथके तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणा-या नागरिकांवर वॉच ठेवणार आहेत. अशाप्रकारे प्रत्येक शिफ्टमध्ये 5 याप्रमाणे 15 पथके एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणार आहेत.

दंडात्मक रक्कम वसूलीपेक्षा नागरिकांना कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सवय लागणे हा पथके स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

——————————————————————————————————