नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम बंद

प्रकल्पग्रस्त डंम्पर मालक वाहतूकदार ठेकेदारांची योग्य मोबदल्याची मागणी  

नवी मुंबई, 29 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

नवी मुंबई विमानतळाची विकासपूर्व कामे करणा-या स्थानिक वाहतूकदार ठेकेदारांना योग्य मोबदला मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत या ठेकेदारांनी आज ओवळे येथे रास्ता रोको करत आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत हे आंदोलन होऊ दिले नाही. यामुळे प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सिडकोने विमानतळाची विकासपूर्व कामे करण्यासाठी जीव्हीके, बालाजी, गायत्री यांना मुख्य कंत्राट  यांना दिले आहे. तर टीआयपीएल, जेएन म्हात्रे इन्फ्रा यांनी सब कंत्राटदार म्हणून एकत्रितपणे काम सुरू केले.  भरावासाठी लागणारे ३०० डंम्पर आणि पोकलेनचे काम येथील विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतक-यांना देण्यात आले आहे. यासाठी स्थानिकांनी डंपर आणि पोकलन लावले आहेत, यासाठी  डंपरमागे दिवसाचे 600 रुपये देण्यात येत होते मात्र मागील तीन महिन्यानंतर  600 वरून 400 रुपये देण्यात आले आहेत. मात्र हा मोबदला कमी असून योग्य भाव दिला जावा यासाठी प्रकल्पग्रस्त डंम्पर मालक संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे. दहा गावांतील 149 वाहतूकदारांनी 24 नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. यामुळे विकासपूर्व कामे करणारे 300 डंपर, जेसीबी आणि पोकलेन जागेवरच उभ्या आहेत.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती आली असताना मुख्य ठेकेदार आणि प्रकल्पग्रस्त डंम्पर मालक यांच्या वादामध्ये गेले सहा दिवस काम बंद पडले आहे. या वादावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.