नवी मुंबईत कोविड सेंटर पुन्हा सुरू  

 तुर्भे येथील राधास्वामी सत्संग आश्रम कोविड सेंटर सुरू

निर्यात भवनमधील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याची तयारी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 25 मार्च 2021:

10 मार्चपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत असून मागील आठवडाभरातील वाढीचा झपाटा मोठा आहे. त्यामुळे कोरोना बाधित रूग्णांवर सुयोग्य उपचारासाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली कोविड सेंटर सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार 24 मार्चपासून तुर्भे, सेक्टर 24 येथे राधास्वामी सत्संग आश्रमाठिकाणचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे तुर्भे सेक्टर 19 मध्ये निर्यात भवन (एक्स्पोर्ट हाऊस) येथील तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेले कोविड सेंटरही कार्यान्वित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. काही तात्पुरती बंद केलेली कोव्हीड केअर सेंटर्स सुरू करण्यात येत असून यामधील काही केंद्रे महिलांसाठी राखीव असणार आहेत.

एक्पोर्ट हाऊस मधील जम्बो लसीकरण केंद्र वाशी ईएसआयएस रूग्णालयात स्थलांतरित

सध्या निर्यात भवन (एक्स्पोर्ट हाऊस) याठिकाणी जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले होते. सदर जम्बो लसीकरण केंद्र हे सेक्टर 5, वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयात स्थलांतरित करण्यात आलेले असून या ठिकाणी सकाळी 9 ते 5 या वेळेत लाभार्थी नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.