50 वर्षावरील कोविड रूग्णांवर रूग्णालय अथवा कोविड सेंटरमध्ये उपचार

महापालिका आयुक्तांचा खाजगी डॉक्टरांना सल्ला

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10 मे 2021:

50 वर्षावरील आणि कोमॉर्बिड कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना घर मोठे असले तरी गृह विलगीकरणात थांबू नये तर  महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये अथवा खाजगी रूग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेण्याचा सल्ला द्यावा व त्याचे महत्व पटवून द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांना केले.

मागील रविवारी 300 हून अधिक खाजगी डॉक्टरांशी वेबसंवाद साधल्यानंतर आज आयुक्त बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील 96 नामांकित वरिष्ठ फिजीशिअन डॉक्टरांसोबत ऑनलाईन संवाद साधत गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांच्या आरोग्य स्थितीविषयी व याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याविषयी सविस्तर चर्चा केली.

या वेबसंवादाप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. उदय जाधव, डॉ. अजय कुकरेजा व डॉ. अक्षय छल्लानी यांनी गृह विलगीकरणातील रूग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन याविषयावर सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे नंतरच्या चर्चासत्रात विविध शंकांचे निरसनही केले. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होत्या.

कोविडच्या दुस-या लाटेतील रुग्णांच्या आरोग्य स्थितीचा तसेच महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर प्राप्त बेड्स उपलब्धतेच्या मागणीचा नियमित आढावा घेताना प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे गृह विलगीकरणात (Home Isolation) असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींची ऑक्सिजन पातळी घरीच झपाट्याने खालावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रूग्णांना ऑक्सिजन बेड्सची मधली पातळी ओलांडून थेट आयसीयू बेड्स अथवा व्हेंटिलेटरची गरज भासताना निदर्शनास येत आहे. ही परिस्थिती रूग्णांच्या प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून या दुस-या लाटेत एकूण मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू हे 50 वर्षावरील व्यक्तींचे झालेले आहेत. त्यामुळे फिजीशिअनमार्फत हा सल्ला द्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील फिजीशिअन यांना केले.

नवी मुंबई महानगरपालिकेचे सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोव्हीड सेंटर हे सर्वच दृष्टीने उत्तम असून तेथील व्यवस्थेची प्रशंसा त्याठिकाणी आरोग्य सेवेचा अनुभव घेतलेल्या विविध स्तरांतील आणि क्षेत्रांतील अनेक व्यक्तींनी विविध माध्यमांतून केलेली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्ती शक्यतो गृह विलगीकरणात राहण्यापेक्षा महानगरपालिकेच्या सिडको सेंटरसारख्या उत्तम आरोग्य सुविधेच्या ठिकाणी अथवा रूग्णाच्या इच्छेनुसार खाजगी रूग्णालय ठिकाणी दाखल होण्यास प्राधान्य द्यावे असे यावेळी सूचित करण्यात आले.

गृह विलगीकरणातील रूग्णाने ठेवायच्या नोंदी

गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना बाधीत रूग्णासोबत थर्मामीटर, पल्स ऑक्सीमीटर, सॅनिटायझर व फेस मास्क असलाच पाहिजे तसेच अशा रूग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्टपणे सूचित करण्यात आले. गृह विलगीकरणातील रूग्णाने दररोज 4 ते 6 वेळा आपल्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासून त्याची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये ‘6 मिनीट वॉक टेस्ट’ अत्यंत महत्वाची असून रूग्णाने विलगीकरण केलेल्या खोलीत 6 मिनिटे चालून त्यानंतर आपल्या शरीराची ऑक्सिजन पातळी तपासणे गरजेचे आहे. ही ऑक्सिजन पातळी 94 व त्यापेक्षा खाली असणे धोकादायक असून सातत्याने 100 डिग्री फॅरनाईट किवा त्यापेक्षा ताप असणे ही देखील धोकादायक बाब आहे.

——————————————————————————————————-