म्युकरमायकोसिसमध्ये आढळणारी लक्षणे

महाराष्ट्रात 2,000 हून अधिक लोकांना संसर्ग

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 14 मे 2021:

म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्गाचा आजार कोविड मधून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना होत असल्याचे आढळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या आजाराने सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून 2,000 हून अधिक लोकांना या दुर्मिळ आजाराचा संसर्ग झाला आहे. काही रुग्णांना या आजारामुळे आपली दृष्टीही गमवावी लागली आहे.

म्युकरमायकोसिस किंवा ज्याला सामान्यपणे काळी बुरशी असे म्हटले जाते, तो बुरशी प्रादुर्भावामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होणारा आजार आहे. सभोवतालच्या वातावरणात असलेल्या म्युकरमायसेटीस या सूक्ष्म-जीवांमुळे हा आजार होतो. म्युकरमायसेटीस मातीत किंवा पाने, खते अशा सडत/विघटित होत जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळतात.कोविडमधून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना या बुरशीचा संसर्ग होत असल्याचे आढळत आहे .

म्युकरमायकोसिस कशामुळे होतो?

वातावरणातील बुरशीजन्य कणांच्या संपर्कात आल्याने लोकांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. शरीरावर कापण्यामुळे, खरचटण्यामुळे, भाजण्यामुळे झालेल्या जखमेतून किंवा इतर प्रकारच्या त्वचारोगांमुळे झालेल्या जखमेतून या बुरशीचा शिरकाव झाल्यामुळेही हा संसर्ग होऊ शकतो.

  • अनियंत्रित मधुमेह, स्टेरॉईडच्या वापरामुळे,
  • अतिदक्षता विभागात/ रुग्णालयात दीर्घकाळ दाखल असणे
  • अवयव प्रत्यारोपण/ ट्युमर( कर्करोगकारक पेशींची उपस्थिती) नंतर सहव्याधी
  • व्होरिकोनॅझोल उपचार( गंभीर बुरशी संसर्गावरील उपचार)
  • डेक्समेथासोन औषधांमुळे हा संसर्ग होऊ शकतो.

केवळ कोविड रुग्णच नाही ज्यांना मधुमेह आहे, अशा अनेक, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा लोकांनाही म्युकरमायकोसिस होऊ शकतो. आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती अशा बुरशीच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यास सक्षम असते. मात्र, कोविड रुग्णांवर उपचार करतांना रोगप्रतिकार दाबून टाकणारी डेक्समेथासोन सारखी औषधें असतात. या औषधांमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्याशिवाय,जे रुग्ण ऑक्सिजन आधारावर अतिदक्षता विभागात उपचार घेत असतात, तिथे या प्रणालीमध्ये ह्युमिडीफायर असते,ज्यामुळे पाण्यातील आर्द्रतेतून बुरशी संसर्ग होण्याची शक्यता असते.

मात्र, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कोविड रुग्णाला म्युकरमायकोसिसचा धोका संभवतो. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे मात्र त्याचवेळी जर त्यावर योग्य आणि वेळेत उपचार केले गेले नाहीत, तर तो प्राणघातकही ठरु शकतो.आजाराचे लवकर निदान आणि उपचार यावर बरे होण्याचे प्रमाण अवलंबून असते.

  • आजाराची सामान्य लक्षणे काय आहेत?

म्युकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरु शकतो.या संसर्गामुळे चेहरा आणि नाकावर काळे डाग पडतात किंवा तिथल्या त्वचेचा रंग बदलतो. दृष्टी अधू होते, छातीत दुखू लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि खोकल्यातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे जाणवू शकतात.

मात्र, नाक चोंदण्याच्या सगळ्याच रुग्णांना जिवाणूजुन्या सायनसिटीस झाला असावा असे गृहीत धरु नये असा सल्ला, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिला आहे.विशेषतः कोविड रुग्णांवर उपचार सुरु असताना किंवा झाल्यावर हे लक्षात घ्यावे. हा बुरशीसंसर्ग आहे का हे जाणून घेण्यासाठी, वैद्यकीय तपासणी आणि सल्ला घेणे उचित ठरेल.

उपचारपध्दती

साध्या त्वचासंसर्गापासून म्युकरमायकोसिसची सुरुवात होत असली तरी तो शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. यावर उपचार करताना सर्व मृत आणि संसर्ग झालेल्या ऊती शस्त्रक्रिया करून काढून टाकाव्या लागतात, त्यामुळे काही रुग्णांना वरचा जबडा गमवावा लागतो किंवा काही वेळा अगदी डोळा देखील गमवावा लागतो. तसेच 4 ते 6 आठवड्याचे इंट्राव्हेनस अँटी- फंगल उपचार, रुग्णाला संसर्गमुक्त करण्यासाठी करावे लागतात. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असल्याने सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अंतर्गत औषध तज्ञ, इंटेन्सिव न्यूरॉलॉजिस्ट, कान- नाक- घसा तज्ञ, नेत्रविकारतज्ञ, दंतवैद्य, शल्यविशारद आणि इतरांचा समावेश असलेल्या एका टीमची उपचारांसाठी गरज भासते.

अशी घ्या काळजी

मधुमेही असलेल्या कोविड रुग्णांनी मधुमेह नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. स्वयं उपचार आणि स्टेरॉईडचा प्रमाणाबाहेर वापर यामुळे जीवावर बेतू शकते आणि म्हणूनच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच औषधे घेतली पाहिजे.

स्टेरॉईड व्यतिरिक्त टोसिलिझुमाब, आयटोलिझुमाब यांच्या वापराने देखील रोगप्रतिकारक्षमता प्रणालीवर परिणाम होतो. कोरोना विषाणू सायटोकिन्सचा स्राव सोडत असल्याने मल्टी ऑर्गन फेल्युअर सारखी गंभीर स्थिती निर्माण होत असल्याने त्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांमुळे रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे ही औषधे योग्य प्रकारे वापरली नाहीत तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे बुरशीसंसर्गाला तोंड देण्यामध्ये ती अपयशी ठरण्याचा धोका निर्माण होतो. रोगप्रतिकारक्षमतेला चालना देणाऱ्या किंवा ती दाबून टाकणाऱ्या अशा इम्युनोमॉड्युलेटिंग ड्रगचा वापर कोविड-19 रुग्णांनी थांबवावा, अशी सूचना आयसीएमआरच्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे. असे विपरित परिणाम टाळण्यासाठी टोसिलिझुमाबच्या मात्रेमध्येही कोविड कृती दलाने सुधारणा केली आहे. तसेच योग्य प्रकारची स्वच्छता राखण्यामुळे देखील हा बुरशी संसर्ग टाळता येतो.

 

कोरोनाच्या उपचारामुळे शरीरातील नैसर्गिक मायक्रोऑर्गनिझम नष्ट होतात परिणामी रोगप्रतिकारकशक्ती कमी होवून म्युकॉरमायकोसीस दात पेशीवर हल्ला करतात त्यामुळे दातदुखी असलेल्या कोरोना रूग्णांनी दंत तज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे. कोविडमधून बरे झाल्यानंतर 1 महिना आयर्नचे औषध घेवू नये.

– डॉ.सुदर्शन रणपिसे, कायदेशीर सल्लागार, भारतीय दंतशल्य संघटना, मुंबई


  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप