नवी मुंबईतल्या दक्षता पथकांकडून 3 लाख 48 हजार दंडाची वसूली

3 दिवसात 1120 जणांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन

मागील 7 महिन्यात 31364 जणांवरील कारवाईतून 1 कोटी 33 लाखाहून अधिक दंडवसूली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 मार्च 2021:

10 मार्चपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, सोशल डिस्टन्सींग आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे नागरिकांकडून काटेकोर पालन केले जावे यासाठी पालिका प्रशासनाकडून  लक्ष दिले जात आहे. मात्र हे नियम न पाळणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 21 ते 23 मार्च अशा तीनच दिवसात 1120 जणांवर कारवाई करीत 3 लाख 48 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. तर 10 ऑगस्ट पासून 23 मार्चपर्यंत कोविड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या 31 हजार 364 व्यक्ती / व्यावसायिक यांच्याकडून एकूण 1 कोटी 33 लाख 60 हजार 250 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

कोविड या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून वैयक्तीक आणि सामाजिक आरोग्याला बाधा पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांना समज म्हणून दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाया अधिक प्रभावीपणे करण्यासाठी 155 जणांचा समावेश असणारी विशेष दक्षता पथके सर्व विभागांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली असून प्रत्येक पथकात 5 कर्मचारी अशा 31 पथकांमार्फत कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर धडक कारवाई केली जात आहे. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्राकरिता सकाळी 1 व रात्री 1 अशी 2 पथके त्याचप्रमाणे कोरोना प्रसारचा संभाव्य धोका असणा-या एपीएमसी मार्केटकरिता 5 पथके सकाळ, दुपार, रात्र अशा तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत.

विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये आधीची पोलीसांसह नियुक्त दक्षता पथके सद्यस्थितीत कार्यरत आहेतच. याव्यतिरिक्त मुख्यालय स्तरावरून परिवहन व्यवस्थापक यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त ही विशेष दक्षता पथके यांचेमार्फत विभागांतील लग्न व इतर समारंभांतील संख्या मर्यादा तसेच रेस्टॉरंट, बार याठिकाणी कोरोना नियमांचे पालन होते की नाही यावरही बारीक लक्ष असणार असून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या  विशेष दक्षता पथकांमार्फत प्रभावी कामगिरी केली जाणार आहे.

कोविड सुरक्षा नियम मोडणा-या नागरिकांक़डून दंडात्मक रक्कम वसूलीपेक्षा नागरिकांना कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सवय लागणे हा विशेष दक्षता पथके स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश असून नागरिकांनी कोरोनाचा वाढता धोका ओळखून गाफील न राहता कोविड सुरक्षा नियमांचे व त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे .

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर