पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतील 14 आरोग्यकर्मींचा सन्मान

राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त महापालिकेचा विशेष कार्यक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 16 फेब्रुवारी 2022:

राष्ट्रीय लसीकरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणा-या 14 फ्रंटलाईन आरोग्य कर्मचा-यांचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय गट पातळीवर प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

 

16 मार्च 1995 रोजी राष्ट्रीय स्तरावर पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्या अनुषंगाने 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात येतो. या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून त्यानिमित्त आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे शासन स्तरावरून सूचित करण्यात आले होते.

महानगरपालिका क्षेत्रातील 23 नागरी आरोग्य केंद्रांचे क्षेत्रनिहाय 7 गट करून प्रत्येक गटातील ज्या एएनएम व आशा स्वयंसेविका यांनी नुकत्याच 27 फेब्रुवारी 2022 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्वाधिक चांगले काम केले आहे अशा 21 फ्रंटलाईन आरोग्य कर्मचा-यांना सन्मानित करण्यात आले.

 

यामध्ये सीबीडी, करावे, सेक्टर 48 नेरुळ या नागरी आरोग्य केंद्रांच्या गटातील सुलोचना ऐनकर या एएनएम तसेच मंगल दामोदर व सारिका डोहाळे या आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

नेरुळ 1, नेरुळ 2, कुकशेत, शिरवणे या नागरी आरोग्य केंद्रांच्या गटातून एएनएम मोहिनी निकुंब व आशा स्वयंसेविका विणादेवी राणा आणि रुक्मिणी तेली याचा सन्मान झाला.

तुर्भे, सानपाडा, जुहुगांव या नागरी आरोग्य केंद्रांच्या गटात वैशाली वाडकर या एएनएम तसेच सत्वशीला गोडबोले व लावण्या पोला या आशा स्वयंसेविका सन्मानित झाल्या.

महापे, पावणे, नोसिल नाका या नागरी आरोग्य केंद्रांच्या गटामधून एएनएम पुर्वा भोकरे तसेच निता गायकवाड व पंचफुला भगत या आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला.

वाशीगांव, इंदिरानगर, खैरणे या नागरी आरोग्य केंद्रांच्या गटात कुसुम निकम या एएनएम तसेच सरला ओसरमल व शोभा कोळमकर या आशा स्वयंसेविकांना गौरविण्यात आले.

कातकरीपाडा, घणसोली, इलठणपाडा या नागरी आरोग्य केंद्रांच्या गटात एएनएम सुमित्रा चौधरी आणि आशा स्वयंसेविका सबिता मुन्नी व कमल कोचेवाड यांचा सन्मान झाला.

दिघा, राबाडे, ऐरोली, चिंचपाडा या नागरी आऱोग्य केंद्रांच्या गटातून पौर्णिमा परांजपे या एएनएम तसेच अनिता पायगुडे व रेश्मा खोपटकर या आशा स्वयंसेविकांना सन्मानित करण्यात आले.

या सन्मानाप्रसंगी सातही कार्यक्रमस्थळी स्थानिक कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच छायाचित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत उत्तम कामगिरी करणा-या आरोग्यकर्मींचा सन्मान होत असताना लसीकरण नियंत्रक वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण तसेच ठिकठिकाणी त्या त्या नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैदयकीय अधिकारी, एएनएम, एलएचव्ही, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

===============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप