उलवे सेक्टर 19 येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये 34 ऑक्सिजन बेड्सचे आधुनिक केविड केअर सेंटर सुरू

उलवे, उरण, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातील नागरिकांना प्राधान्य देण्याचा रुग्णालयाचा निर्णय

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • उलवे, 20 मे 2021

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजन बेड्ससह आयसीयू बेड्स, व्हेंटीलेटर्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी उलवे येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये 34 ऑक्सिजन बेड्स आणि 5 आयसीयू बेड्स असलेले अदयावत सुविधांनी सुसज्ज असे कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमुळे उलवे, उरण, पनवेल तसेच रायगड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा  उपलब्ध होणार आहेत. अपेक्स हॉस्पिटलमधील या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या आधुनिक सुविधांनी सुसज्ज कोव्हिड सेंटरच्या उपलब्धतेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • यावेळी कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर नियमांचे पालन करीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, वहाळ ग्रामपंचायतीच्या संरपच पुजा पाटील, इंटकचे ठाणे जिल्हाध्यक्ष मिथुन पाटील, नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका पूनम पाटील, भारती कोळी, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात रामशेठ ठाकूर म्हणाले की, उलवा  नोड आता गाव राहीलेले नाही, ग्राम पंचायत राहीलेली नाही. अतिशय मोठे असे शहर निर्माण होवू लागलेले आहे. भविष्यकाळात उरण तालुका लहान होईल आणि उलवे तसेच करंजाडे हे भाग मोठे होतील. त्यामुळे आरोग्य व्यवस्था निर्माण करणे हे  मोठे आव्हान आहे. अपेक्ससारख्या हॉस्पिटलकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर कोविड सेंटर त्वरीत बंद न करता सुरूच ठेवावीत आणि नागरिकांना सेवा द्यावी, असे आवाहन ठाकूर यांनी शेवटी केले.

अपेक्स रुग्णालयातील सेवांबद्दल डॉ. निखील वर्गे यांनी सांगितले की, उलवे सेक्टर १९ मधील अपेक्स हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा असणारे ३४ बेड्स आहेत. याशिवाय  ५ आयसीयू बेड्सही उपलब्ध असून त्यामध्ये व्हेंटीलेटर्सचीही सुविधा आहे. गेले वर्षभर आम्ही कोविड बाधित रुग्णांवर उपचार केलेले आहेत. आता उलवे तसेच परिसरातील कोरोना बाधित नागरिकांना उलवे येथेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे आधुनिक कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. निखील वर्गे यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोविड बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. नव्याने विकसित होत असलेल्या उलवे परिसर आणि आजुबाजूच्या परिसरात चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अपेक्स हॉस्पिटलने पावले उचलली आहेत. कोविड बाधित रुग्णांना माफक दरात आधुनिक उपचार उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता असून या कोव्हिड सेंटरचा लाभ उलवे, उरणसह रायगड जिल्ह्यातील नागरिकांना प्राधान्याने देण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे डॉ. विजय घोरपडे यांनी दिली.

अपेक्ष हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरमध्ये २४ तास प्रशिक्षित डॉक्टर्स तसेच वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहणार असून रुग्णांना वैद्यकीय सेवांसह सकस भोजनही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. विजय घोरपडे यांनी सांगितले.

अपेक्स हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमात पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, इंटकचे ठाणे जिल्हाध्यक्ष मिथुन पाटील, नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका पूनम पाटील, भारती कोळी, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या आक्रमण काळात अपेक्स रुग्णालय करीत असलेले कार्य तसेच त्यांच्या या नवीन उपक्रमाचे कौतूक केले आणि भविष्यात अपेक्स रुग्णालय नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा अव्याहतपणे देत राहील, असा विश्वासही व्यक्त केला.

सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. अशावेळी सामाजिक जबाबदारीतून गोरगरीबांसाठी कोरोनाच्या संकटात योग्य त्या वैद्यकीय सेवा सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुजित कोळी यांनी यावेळी सांगितले.

अपेक्स रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी डॉ. विजय घोरपडे, डॉ. मयुरी घोरपडे, डॉ. निखिल वर्गे, डॉ. सोनिया वर्गे, बेबीताई कृष्णा कोळी, सुजित कोळी, रचना कोळी आदींनी परिश्रम घेतले.

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टीक्षेप