अलिबागमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “तिरंगा यात्रा” 

देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमले अलिबाग

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • अलिबाग, 13 ऑगस्ट 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 12 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज अलिबाग येथे “तिरंगा यात्रा” मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण अलिबाग शहर या रॅलीतील देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेले.

या तिरंगा यात्रेत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, ज्ञानदेव यादव, डॉ.सतिश कदम, अलिबाग तहसिलदार मिनल दळवी, मुरुड तहसिलदार रोहन शिंदे यांच्यासह इतर मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी कल्याणकर म्हणाले की, आपण सारे या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करीत आहोत. आज या रॅलीत आपण जो उत्साह दाखविला त्याच उत्साहाने 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करुया. “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. आपल्यामधील प्रत्येकाने किमान 10 घरांवर झेंडा फडकविण्याचे आवाहन करावे व हे अभियान यशस्वी करावे.

या भव्य तिरंगा यात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून राष्ट्रगीताने करण्यात आली. ही “तिरंगा यात्रा” जिल्हाधिकारी कार्यालय-पोलीस अधीक्षक कार्यालय-मारुती नाका-बालाजी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक-अलिबाग नगरपरिषद-डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा-महावीर चौक-जुनी नगरपालिका इमारत मार्गे ब्राम्हण आळी-कन्याशाळा-जिल्हा न्यायालय या मार्गाने मार्गस्थ होवून हिराकोट तलाव येथे राष्ट्रगीताने यात्रेची सांगता करण्यात आली.

या यात्रेदरम्यान क्रांती स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सरखेल कान्होजी आंग्रे समाधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या तिरंगा यात्रेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, सहाय्यक प्रकल्प विकास अधिकारी अरुण पवार, कामगार उपायुक्त पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्सना शिंदे-पवार, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मंडलिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन चे जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये, आपत्ती व्यवस्थापन दल, जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वनविभाग, अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, समाजकल्याण विभाग, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचारी, पोलीस बँड पथक, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय आरोग्य, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसहायता समूहामधील महिला, प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, सक्षम एज्युकेशन सोसायटी, माणुसकी प्रतिष्ठान, लाईफ फाऊंडेशन, स्पर्धाविश्व अॅकॅडमी या व इतर विविध सामाजिक संघटना, जेएसडब्ल्यू, रिलायन्स, आरसीएफ अशा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, जे.एस.एम महाविद्यालयाचे विद्यार्थी, आशा सेविका, अंगणवाडी  सेविका, जिल्हा होमगार्ड, अलिबाग वकील संघटना, रास्त भाव धान्य वितरण केंद्राचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या संपूर्ण रॅलीमध्ये पोलिसांच्या बँड पथकाने विविध देशभक्तीपर गीतांच्या धून वाजवून वातावरण चैतन्यमय केले. या संपूर्ण कार्यक्रमाची समन्वयाची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील व तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर, तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ यांनी पार पाडली.