सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी IAS सिध्दाराम सालीमठ यांची नियुक्ती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई, २२ ऑक्टोबर २०२२

सिडकोच्या सहव्यवस्थापकी संचालक पदी IAS सिध्दाराम सालीमठ (IAS Siddharam Salimath) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सालीमठ हे २०११ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. सिद्धाराम सालीमठ यांनी कृषी संशोधन विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. १९९५ पासून ते प्रशासकीय सेवेत आहेत. मागील २७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत त्यांनी महसूल, शहरी विकास, जमीन अधिग्रहण या विषयांवर मोठय़ा प्रमाणात काम केले आहे. सिडकोत येण्याआधी IAS सिध्दाराम सालीमठ यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.

जव्हार, कणकवली, सावंतवाडी जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सिधुंदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली जिल्ह्याचे जमीन अधिग्रहण अधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, यूएलसी मुंबई चे सक्षम प्राधिकारी, उपसचिव नागरी विकास विभाग, ओएसडी टू एसीएस महसूल, कोकण विभागीय महसूल विभागाचे उप आयुक्त या विविध पदांवर काम केले आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम ठोसपणे राबविले. विशेषतः कोविड काळात सालीमठ यांनी पालघरच्या ग्रामीण भागांतील लोकांमध्ये जनजागृतीसाठी अनेक उपक्रम सुरू केले. सुपोषण उद्यान, रान मेवा स्पर्धा, संपूर्ण स्वस्थ आहार याविषयीचे महोत्सव सिद्धाराम सालीमठ यांनी  सुरू केले.

नागरी विकास विभागात उपसचिव म्हणून काम करताना त्यांनी मुंबई मेट्रो रेल 3, मुंबई मेट्रो रेल 7, पुणे मेट्रो रेल, नागपूर मेट्रो रेलचे महत्वकांक्षी प्रकल्प यशश्वीपणे हाताळले आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळसंबंधी प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. विमानतळ प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाची कॅबिनेट नोट बनविण्यात सालीमठ यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे IAS सिद्धाराम सालीमठ यांची सिडकोमध्ये नियुक्ती झाल्यामुळे नवी मुंबई विमानतळ तसेच इतर प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता  आहे.

याशिवाय IAS सिद्धाराम सालीमठ यांनी  सिडको, एमएमआरडीए हाताळत असलेल्या न्हावा शेवा शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, एमयूटीपी, एमआरव्हीसी, उन्नत रेल्वे मार्ग अशा विविध प्रकल्पांमधील समस्याही हाताळल्या आहेत.

कोकण विभाग महसूल उपायुक्त म्हणून काम करताना कातकरी उत्खान अभियानात जून २०१७ ते ऑगस्ट २०१७ या काळात कोकण विभागातील ६ जिल्ह्यांमधील कातकरी नागरिकांचा शोध घेवून त्यांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला. याच काळात तब्बल ६० हजारांहून अधिक कातकरी समाजबांधवांची नावे मतदार यादीत जोडून त्यांनाही मतदानाचा अधिकार उपलब्ध करून दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कामही सालीमठ यांनी सांभाळले आहे.