मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढाकार घेणार’

आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल, 14 मे 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक खाजगी आणि सिडकोच्या इमारतींची अवस्था वाईट आहे.या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी भाजपा पुढाकार घेईल, अशी ग्वाही पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

प्रत्येक नागरिकाचे स्वत:चे हक्काचे घर असावे,अशी भुमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेत भाजपा सत्तेत आल्यास पंतप्रधानांच्या या भुमिकेला मूर्त रुप देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे ठाकूर यांनी सांगितले.

पनवेल महापालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या कळंबोलीमधील केएल टू आणि केएल फोर, नवीन पनवेलमधील सेक्टर सातमधील सिडको वसाहत, तर खांदेश्वर येथील ए टाईपच्या इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. या शिवाय जुन्या पनवेलमधील अनेक खाजगी इमारतीही धोकादायक स्थितीत असून मालक आणि भाडेकरूंच्या वादामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. तर सिडकोच्या मालकीच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सिडको पुढाकार घेत नाही. या इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे जीव मुठीत धरून राहत आहेत. या इमारतीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले  असून भाजपाच्या जाहिरनाम्यात आम्ही पुनर्विकासाच्या या मुद्द्यांचा विस्तृतपणे ऊहापोह केला आहे, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

सिडकोच्या इमारती ज्या जागांवर उभ्या आहेत, त्या जमिनी फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या सिडकोच्या इमारतीच्या पुनर्विकासामधील प्रमुख अडथळा दूर झालेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुनर्विकासाबाबतच्या विविध नियमांचा आधार घेत आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक विस्तृत धोरण बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.