छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन

 महाराष्ट्राच्या राज्यगीताचे अभिमानाने समूह गायन

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 फेब्रुवारी 2023

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ १ विभागाचे नमुंमपा उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, उपायुक्त  अनंत जाधव, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त  दत्तात्रय घनवट, कार्यकारी अभियंता अजय संख्ये आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 महाराष्ट्र शासनाने आजपासून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे कविवर्य राजा बढे लिखित गीत महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून अंगीकृत केले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाच्या वतीने राज्यगीताचे समूहगान  करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील एम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त अनंत जाधव, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट, कार्यकारी अभियंता अजय संख्ये व सुनील लाड आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगीही महाराष्ट्राच्या राज्यगीताचे समूह गायन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून सेक्टर 15, ऐरोली येथील महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने व इतर अनुषंगिक कार्यक्रम आयोजित करण्याची वैचारिक परंपरा जपत आज पोवाडे आणि शाहिरी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर रूपचंद चव्हाण आणि सहकाऱ्यांनी ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ हा दमदार कार्यक्रम सादर करीत छत्रपती शिवरायांना स्वरवंदना अर्पण केली व उपस्थितांची मने जिंकली.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL