‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सर्वेक्षणात नागरिकांना सहभागाचे आवाहन  

महापालिका आयुक्तांकडून विभागनिहाय सविस्तर आढावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23 नोव्हेंबर 2022:

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील निवासयोग्य शहरांची स्पर्धा ‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेंतर्गत नागरिक अभिप्राय सर्वेक्षण (Citizen Perception Survey) करण्यात येत असून शहरातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतुक व्यवस्था अशा विविध बाबींविषयी नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येत आहेत.  ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यापूर्वीच अधिका-यांच्या विशेष बैठकीत दिले होते. याबाबत झालेल्या कार्यवाहीचा विभागनिहाय सविस्तर आढावा आयुक्तांनी अधिका-यांच्या बैठकीत घेतला तसेच याबाबत अधिक व्यापक स्वरूपात व गतीमानतेने कार्यवाही करण्याचे आदेश विभागप्रमुखांमार्फत सर्व अधिकारी, कर्मचा-यांना दिले.

सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत: तसेच आपले कुटुंबिय यांचे अभिप्राय प्राधान्याने नोंदवावेत त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर सोसायट्या, शाळा – महाविद्यालये, सरकारी तसेच खाजगी आस्थापना, उद्योग, व्यवसाय ठिकाणे येथे भेटी देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या नवी मुंबई शहरविषयी मनात असलेली प्रेमाची व अभिमानाची भावना या अभिप्रायाच्या स्वरूपात दाखल करण्याविषयी नागरिकांपर्यंत पोहचण्याचे सूचित केले होते.

 

नागरिक अभिप्राय सर्वेक्षणात (Citizen Perception Survey) सहभागी कसे व्हावे ?

नवी मुंबई शहर उत्साहाने व पूर्ण क्षमतेने या स्पर्धेत सहभागी झाले आहे. या शहरातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतुक व्यवस्था अशा विविध बाबींविषयी नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येत आहेत.  हे अभिप्राय घेण्याकरिता http://bit.ly/3ObpOa9 ही लिंक केंद्र सरकारमार्फत उपलब्ध करून देण्यात आली  आहे. या लिंकवर क्लिक करून नागरिक अभिप्राय सर्वेक्षण (Citizen Preception Survey) यामध्ये भाषा निवडून रेफरल कोड 802788 टाकावा व त्यानंतर स्वत:चे नाव, आडनाव, नोकरी/व्यवसाय, स्त्री/पुरूष, वय, शिक्षण, राज्य, शहर याबाबत माहिती भरायची आहे. त्यानंतर त्यामधील 17 प्रश्नांवर योग्य पर्याय निवडून नागरिकांनी विविध विषयांवर अभिप्राय नोंदवायचे आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेसह वैशिष्टयपूर्ण प्रकल्प, कामांमुळे तसेच दर्जेदार सेवासुविधांमुळे  राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध बहुमान, पुरस्कार प्राप्त झाले असून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या प्रत्येक उपक्रमातील सक्रिय सहभागाचा महत्वाचा वाटा राहिला आहे.

नवी मुंबईकर नागरिकांनी शहराविषयी मनात असलेले प्रेम व सार्थ अभिमान व्यक्त करीत नवी मुंबईला देशातील नंबर वन निवासयोग्य शहर बनविण्यासाठी आपले अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

———————————–