अमृत अभियानाच्या केंद्रीय पथकाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पांबद्दल व्यक्त केले समाधान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 जून 2023

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने अमृत व अमृत 2.0 अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या प्रकल्पांस केंद्रीय अमृत अभियान पथकाने भेट देऊन सविस्तर माहिती घेत तसेच प्रत्यक्ष पाहणी करीत समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी नमुंमपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी पथकाचे प्रमुख गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांचे उपसचिव हरिश्चंद्र प्रसाद, अमृत पथकाच्या सदस्या सिद्धी मोहटा, अर्नेस्ट अँड यंगच्या प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटचे आयटी मॅनेजर परितोष धवन, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचनालयाचे कार्यकारी संचालक मनोहर हिरे यांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केले.

यावेळी शहर अभियंता संजय देसाई, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे व अजय संखे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

अमृत व अमृत 2.0 या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या प्रकल्पांची याप्रसंगी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. त्या अनुषंगाने विविध मुद्द्यावर चर्चा करीत पथकातील सदस्यांनी या प्रकल्पांद्वारे नागरी सुविधांमधील वाढ तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी  या प्रकल्पांचा होणारा लाभ याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

अमृत अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे आणि ऐरोली येथील सी टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रांमध्ये प्रत्येकी 20 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प उभारले असून त्यातून निर्माण होत असलेल्या पुनर्पक्रियाकृत पाण्याच्या वापराविषयीची विस्तृत माहिती पथकाने घेतली तसेच अमृत 2.0 अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला.

अमृत 2.0 अभियानांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मानकांचा आढावा घेत सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची अंमलबजावणी करताना येत असलेल्या आव्हानांबाबत तसेच मालमत्ता कर व त्यातून मिळणारे उत्पन्न याचाही आढावा पथकाच्या वतीने घेण्यात आला.

याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या जीआयएस मॅपिंगची सद्यस्थिती पथकाने जाणून घेतली तसेच ज्या पाण्यापासून महसूल प्राप्त होत नाही असे नॉन रेव्हेन्यू वॉटर (NRW) रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपायोजनांची माहिती जाणून घेण्यात आली व या उपायोजनांबाबत समाधानही व्यक्त करण्यात आले.

यावेळी पथकाने मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत सांडपाण्याच्या होत असलेल्या वापराचे प्रमाण जाणून घेतले तसेच उद्योग समुहांना देण्यात येणा-या या पुनर्प्रक्रियाकृत पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होत असल्याबदद्ल समाधान व्यक्त केले. भविष्यात या पाण्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती जाणून घेतली.

पाणीपुरवठा व मलनिःस्सारण सेवा अधिकाधिक प्रभावीपणे देण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाबाबत नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या उपक्रमांचीही माहिती यावेळी घेण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्रीय पथकाने कोपरखैरणे येथील 20 द.ल.लि. क्षमतेच्या टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पाला भेट देऊन त्याची प्रत्यक्ष पाहणी केली व तेथील कार्यप्रणाली बारकाईने जाणून घेत समाधान व्यक्त केले.

प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करून संवर्धन करण्यात आलेल्या सेक्टर 14, कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानाला पथकाने भेट दिली व त्याठिकाणी विकसित करण्यात आलेल्या मियावाकी स्वरूपाच्या शहरी जंगलाला भेट देत प्रभावी पर्यावरणशील उपक्रमाबाबत महानगरपालिकेचे कौतुक केले.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तानपत्र