नवी मुंबईत जगातील पहिले मोफत टायफॉईड लसीकरण अभियान

  • 9 महिने ते 15 वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी मोफत लसीकरण

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 12 जुलै 2018:

नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 9 महिने ते 15 वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी मोफत टायफॉइड कंज्युगेट व्हॅक्सिन ही लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटना डब्लूएचओ, सेंटर फॉर डिसीस कंट्रोल अटलांटा, राष्ट्रीय आरोग्य मिशन यांच्या एकत्रित सहयोगाने भारतात पहिल्यांदाच नवी मुंबईत अशा प्रकारची लसीकरण मोहिम होणार आहे. 14 जुलै ते 25 ऑगस्ट या कालावधीत दोन टप्यात हे लसीकरण होणार आहे. महापालिकेच्या 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून सुमारे चार लाख मुलांना ही लस दिली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मुलांचे विषमज्वर (Typhoid) या आजारापासून संरक्षण करणे, हा या लसीकरण अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात यावर्षी 2 लाख मुलांना तर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी दोन लाख मुलांना टायफॉईड कंज्युगेट व्हॅक्सिन (Typbar-TCV) दिले जाणार आहे. याकरिता उत्पादक कंपनीकडून 1 लाख लसी (डोस) नवी मुंबई मनपाला पूर्णत: मोफत मिळणार आहेत. तर उर्वरीत 3 लाख लसी या प्रतिलस (डोस) 200 रुपये या दरात नवी मुंबई महानगरपालिका खरेदी करणार आहे. यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

अभियानाची अंमलबजावणी

  • अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नमुंमपा कार्यक्षेत्रातील 22 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात – नेरुळ से.48, नेरुळ फेज 1, शिरवणे, तुर्भे, इंदिरानगर, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा, दिघा यांच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात लसीकरण होईल. उर्वरीत 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुढच्या वर्षी हे अभियान राबविण्यात येईल.
  • पहिल्या टप्प्यात दिनांक 14 जुलै ते 25 ऑगस्ट  या कालावधीत शनिवार, रविवार, व सार्वजनिक सुट्टीचे दिवस म्हणजेच 14, 15, 21, 22, 23, 28 व 29 जुलै आणि दि. 12, 17, 18, 19, 22 व 25 ऑगस्ट या दिवशी हे अभियान होईल.
  • 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून एकूण 702780 लोकसंख्येमधील 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटातील एकूण अपेक्षित 181598 लाभार्थींना लसीकरण करणेकरीता 1210 केंद्रे (बुथ) आयोजित केली आहे. यामध्ये हॉस्पिटल, क्लिनिक, अंगणवाडी, शाळा, मंदीर, सोसायटी ऑफीस व इतर ठिकाणांचा समावेश आहे.

जगात प्रथम राबविल्या जाणाऱ्या या टायफॉईड कंज्युगेट लसीकरण अभियानाचा लाभ प्रथम टप्प्यातील 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनी घ्यावा, असे आवाहन नवी मुबंईचे महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

==========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड