गणपती विसर्जन व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यातील मिरवणूक बंदोबस्ताचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 26 सप्टेंबर 2023

ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात, यासाठी पोलीस, महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिल्या.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकीसंदर्भात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित पोलीस व महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

ही बातमी वाचा  : Navi Mumbai Morbe Dam: जलपूजनाचा वाद चिघळला

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंह, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने, पोलीस सहआयुक्त संजय जाधव, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त राजेंद्रकुमार दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उल्हास नगरमहापालिका आयुक्त अजीज शेख, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 ही बातमी वाचा : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या नवीन मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. मात्र मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मिरवणुका शांततेत व सामंजस्याने पार पाडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 18 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय वैद्यकीय पथक, होमगार्ड, स्वयंसेवकही मदतीसाठी आहेत. जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला सुमारे दोन हजार सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत गणेश मुर्तींचे विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत दीड दिवस, पाच दिवस व सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन जिल्ह्यात शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

ही बातमी वाचा : चंदेरी दुनियेतील तारे : सीमा – रमेश देव

गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकांमुळे पोलीस दलावर अतिरिक्त ताण पडणार आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा नागरिक मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी बाहेर पडले आहेत. त्यांच्या उत्साहात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेण्यास सांगितले आहे. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घेतली आहे, असेही  देसाई यांनी यावेळी सांगितले.

========================================================

========================================================