बाल वैज्ञानिक परिषदेत नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  18डिसेंबर 2023

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या नाशिक येथे पार पडलेल्या राज्य पातळीवरील फेरीत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 46 गोठीवली येथील पल्लवी सोळंखे व प्रिती चिन्हा राठोड या दोन विद्यार्थिनींनी सादर केलेल्या अभिनव प्रकल्पाची निवड पुढील राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2023 या स्पर्धेत 4500 हून अधिक विज्ञान प्रयोगांचा सहभाग असून यामध्ये 36 जिल्हे सहभागी आहेत. जिल्हास्तरीय फेरीतील 188 प्रकल्पांची निवड होऊन त्यापैकी 52 प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीमध्ये निवड झालेली आहे. त्यापैकी 30 प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नाममुद्रा देश पातळीवर उमटली असून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर,अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुस्कर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना गोसावी आदींनी या विद्यार्थ्यांतचे अभिनंदन केले आहे.

जिज्ञासा ट्रस्ट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ठाणे येथील सुलोचना देवी संघानिया स्कुल याठिकाणी राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या 30 प्रकल्पांचे पत्रकार परिषदेप्रसंगी सादरीकरण करण्यात आले. तेथे सर्वात्त्म 10 प्रकल्पांमध्ये या आगळया वेगळया प्रकल्पाची नोंद झाली असून विल्हेवाट लावता येणारे महिलांचे लघवीचे साधन (Disposable Female Urination Device) या नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या अभिनव प्रकल्पाची निवड पुढील राष्ट्रीय पातळीवर झालेली आहे.

प्रसाधनगृहात विशेषत्वाने महिलांना जाणवणा-या अडचणी व त्यामुळे होणारा त्रास याबाबत उपाय शोधण्याच्या दृष्टीने दोन विद्यार्थिनींनी विज्ञानाची कास धरत केलेला विचार व शोधलेला उपाय ही त्यांच्यामधील कल्पकता आणि शास्त्रीय दृष्टीकोन दाखविणारी गोष्ट असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष  सुरेंद्र दिघे तसेच राज्य समन्वयक विश्वास कोरडे यांनीही या विद्यार्थिनींच्या अडचणीतून शास्त्रीयदृष्ट्या मार्ग काढण्याच्या कल्पकतेची प्रशंसा केली.

नमुंमपा शाळा क्रमांक 46 गोठीवली या शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापक तसेच शिक्षण विस्तार अधिकारी  कल्पना गोसावी, मुख्याध्यापक रघुनाथ शेलार, पंडीत लर्निंग लिंक्स फाऊंडेशन स्टीम लॅबच्या मार्गदर्शक  स्नेहल पोदार तसेच वर्गशिक्षक वासंती पाटील आणि शिक्षकवृंदाचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

याच शाळेच्या अंश शर्मा व विराज गुरव या दोन विद्यार्थ्यांनीही 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आजोबांची आधुनिक काठी हा प्रकल्प सादर करुन आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले आहे. या प्रकल्पाची तालुका स्तरावरुन ठाणे जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.

========================================================

======================================================