24 जून रोजी भूमीपुत्रांचा सिडकोला घेराव

हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा २९ गावांतील ग्रामस्थांचा निर्धार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 18 जून 2021:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र व शहरातील विविध घटकांतील नागरिक आता सरकार विरोधात अधिक संघर्ष करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नामकरणासाठी अधिक आक्रमक भूमिका घेत येत्या 24 जून रोजी स्वर्गीय दि. बा.पाटील यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच सिडको भवनाला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेरूळ इथे झालेल्या बैठकीत 29 गावांतील ग्रामस्थांनी एकमुखाने हा निर्णय घेतला आहे.

10 जून रोजी झालेल्या मानवी इशारा साखळी आंदोलनात बेलापूर ते दिघा या ठाणे बेलापूर पट्टीतील सर्वच भूमीपुत्र व शहर तसेच झोपडपट्टीतील नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी अत्यंत शांततेने व शिस्तीने उतरून एकजूट दाखवून दाखवली . त्याबद्दल त्यासर्वांचंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 24 जून रोजी स्वर्गीय दि. बा.पाटील यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच सिडको भवनाला लाखोंच्या संख्येने मोर्चा नेऊन घेराव घातला जाणार आहे. ज्यात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण व अन्य तालुके त्याचप्रमाणे नवी मुंबईतील सर्व गावे, ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी व इतर समाज व विशेषतः मुंबईतील मूळ भूमीपूत्रही सहभागी होणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

महिला सिडको भवनाजवळच साजरी करणार वटपौर्णिमा

घेराव आंदोलनाकरिता नेरुळ मध्ये झालेल्या बैठकीत सर्व स्थानिय समिती समन्वयक,ग्राम समन्वयक व या लढ्यासाठी पुढील काळात सतत कार्य करण्यास इच्छुक असलेले भूमीपुत्र  उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी त्यादिवशी असणारी वटपौर्णिमा व्रत हे आपल्या पित्याच्या नामाकरणासाठी सिडको भवनाजवळच साजरी करणार असा निर्णय घेतला व तो गावो गावी महिलांना पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे उपस्थित ग्राम समन्वयकांस सोबत घेऊन 24 तारखेच्या घेराव आंदोलनासाठी अधिक प्रसार व जागृती व्हावी याकरिता गावोगावी ग्रामस्थांसोबत बैठका होणार आहेत.

यावेळी नवी मुंबई मुख्य समन्वयक मनोहर पाटील, डॉ.राजेश पाटील, दशरथ भगत, दिपक ह.पाटील, माजी नगरसेवक रामचंद्र घरत, घनश्याम मढवी, विनोद विनायक म्हात्रे, गिरीश म्हात्रे, निलेश पाटील, विजय पाटील, चेतन पाटील,  शिवचंद्र पाटील, शैलेश घाग, सुनील पाटील, राजेश मढवी, मनोज मेहेर, संदिप पाटील, सविनय म्हात्रे, ऍड शिल्पा पाटील, संतोष सुतार, दिगंबर पाटील, सुरेश वास्कर व 29 गावांतील ग्राम समन्वयक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

——————————————————————————————————

  • ————————————————————————————————–10 जून रोजी झालेले मानवी इशारा साखळी आंदोलन