कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा विषयक नमुंमपा मुख्यालयात मार्गदर्शन शिबीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7  फेब्रुवारी 2024

स्त्री शक्तीची ताकद मोठी असून महिलांनी आपले वर्तुळ आता स्वत:च आखायचे असून खंबीरपणे नाही म्हणायला शिकायचे आहे असे सांगत जिल्हा न्यायाधीश  एस एस जैन यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधात्मक कायदा 2013 मधील मार्गदर्शक तत्वांबाबत सुसंवाद साधला.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश एक कार्यालयाच्या वतीने आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधात्म्क कायदा 2013 बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन शिबीराप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी नमुंमपा अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले, विधी विभागाचे विभाग प्रमुख उपआयुक्त  दिलीप नेरकर, भांडार विभागाच्या उपआयुक्त  मंगला माळवे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षण अधिकारी  अरुणा यादव, सहा. आरोग्य अधिकारी डॉ रत्नप्रभा चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राजस्थान राज्यातील भैरवीदेवी प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने निकालात दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कायद्याची माहिती देत न्यायाधीश श्रीम.एस एस जैन यांनी या संवेदनशील विषयाबाबत महत्वाची माहिती दिली. त्याचप्रमाणे https://shebox.nic.in या संकेतस्थळावर सहजपणे तक्रार करता येवू शकते असेही त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीत प्रवेश करताक्षणी येथील स्वच्छता व निटनेटकेपणा यामुळे सकारात्मक वातावरणात प्रवेश केला असल्याची जाणीव होते असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी एक उत्तम उपक्रम राबविल्याबद्दल तालुका विधी सेवा समितीचे आभार व्यक्त करीत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी महिलांच्या न्याय व हक्कासाठी नवी मुंबई महानगरपालिकेत विशाखा समिती सक्षमतेने कार्यरत असल्याचे सांगितले.

या शिबीराप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेतील महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

========================================================

========================================================

========================================================