मालमत्ताकर वसूलीच्या उद्दीष्टपूर्तीसाठी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांची आढावा बैठकीतून आखणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22  फेब्रुवारी 2024 

 सन 2023-2024 च्या अर्थसंकल्पामध्ये महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असणाऱ्या मालमत्ताकर वसुलीकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिल्याने मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यातील 417.18 कोटी रक्कम वसुलीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात जानेवारी 2024 पर्यंत 100 कोटी रक्कमेची अधिकची वसुली अर्थात 520 कोटी इतकी वसूली झालेली आहे. या वर्षी 800 कोटी रक्कमेचे मालमत्ताकर वसूली उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी समूहाने मालमत्ताकर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

याबाबत नुकतीच आढावा बैठक घेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी आपले उद्दीष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपापल्या स्तरावर वसुलीचे नियोजन करावे व ते कालावधीची मर्यादा ठरवून ते साध्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असे स्पष्ट निर्देश दिले.

यावेळी त्यांनी थकबाकीदारांच्या रकमेची उतरत्या क्रमाने विभागवार यादी तयार करून प्रत्येक विभाग कार्यालयास  लक्ष्य ठरवून दिले व याकडे बारकाईने नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. नोटीसींना प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर पुढील कायदेशीर कारवाई करत मालमत्ता जप्त करुन आवश्यकतेनुसार त्यांचा लिलाव करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी दिले.

लिडार सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्तांचे विभागामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन मालमत्ताकराची डिमांड नोटीस देण्याबाबतही तत्पर कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारती आणि एमआयडीसी क्षेत्र येथील मालमत्तांकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशाच प्रकारे गावठाण विभागात बांधलेल्या इमारतीतील घरांना स्वतंत्र मालमत्ताकर देयके वितरीत करुन अधिकाधिक मालमत्ता या कराच्या कक्षेत येतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विविध अंगाने मालमत्ताकराची थकबाकी वसूली करण्यासोबतच करनिर्धारण झालेल्या नवीन मालमत्ता हया मालमत्ताकराच्या कक्षेत येण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी व या माध्यमातून मालमत्ताकराचे लक्ष्य साध्य करण्यावर भर दयावा अशाही सूचना ढोले यांनी दिल्या.

801 कोटी हे या वर्षींचे अर्थसंकल्पीय उद्दीष्ट व 900 कोटी हे आगामी वर्षातील उद्दीष्ट साध्य करणे नियोजनबध्द काम केल्यास अशक्य नाही हे स्पष्ट करीत यामध्ये कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांची दिरंगाई आढळल्यास जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिले.

========================================================


========================================================

========================================================