पनवेलचे उपजिल्हा रूग्णालय १०० खाटांचे होणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल, 10 मे 2017/AV News Bureau:

वाढती लोकसंख्या लक्षात घेवून पनवेल उपजिल्हा रूग्णालयातील खाटांची संख्या ३० वरून १०० करण्यात येणार आहे. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयातील सेवा सुविधा वाढविण्याचे काम सुरू असून शासनाकडून निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय लवकरच सर्वसामान्य गरजू व गरीब रूग्णांना रुग्णालयांत मोफत वैदयकीय सुविधाही  उपलब्ध होणार असल्याची माहिती  भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

पनवेल नगरपालिकेच्या पाठीमागील इमारतीत पनवेल ग्रामीण रूग्णालय होते. मात्र ही इमारत मोडकळील आल्याने रूग्णालय कोळीवाडा येथे हलविण्यात आले. ही जागा भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. गेल्या चार वर्षापासून रूग्णालय सुरू आहे. रूग्णालय उभारणीसाठी पनवेल नगरपालिकेने जेष्ठ नागरीक संघाच्या इमारतीच्या बाजूचा 7736.20 चौरस मीटरचा भूखंड ग्रामीण विनामोबदला आरोग्य विभागाला दिला. या ठिकाणी रूग्णालयाची इमारत बांधण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धुळ खात पडून होता. आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याने 10 फेब्रुवारी 2009 साली 30 खाटांच्या इमारतीला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. त्या कामासाठी 3 कोटी रूपये खर्चालाही शासनाने मान्यता दिली. 30 आँक्टोबर 2010ला 2 कोटी रक्कमेस तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. 2011 साली तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय बांधण्याची मागणी केली. त्यानुसार 2 फेब्रुवारी 2011 रोजी ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर 30 खाटांची क्षमता असलेल्या ग्रामीण रूग्णालयाचे 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मंजूरी मिळाली. त्यानंतर शासनाच्या  मुख्य वास्तुशास्त्रज्ञाने नवीन वास्तुशास्त्रीय आराखडे  तयार केले. त्यानुसार या कामाचे अंदाजपत्रक 16 कोटी 91 लाख 96 हजारांवर गेले. मुळ 3 कोटीचा आराखडा वजा करून  अतिरिक्त 13 कोटी 83 लाख 98 हजार रक्कमेच्या अंदाज पत्रकाला आरोग्य विभागाकडून मान्यता मिळाल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

  • ट्रामा केअर सेंटर लवकरच सुरू

पनवेल परिसराची लोकवस्ती आठ लाखांवर जावून पोहचली आहे. त्याचबरोबर या भागातून महामार्ग जात असून येथे अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. गंभीर प्रकृती असलेले रूग्ण त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांना  त्वरीत आणि याच ठिकाणी उपचार मिळावे याकरीता ट्रामा केअर सेंटर उभारण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार रूग्णालयात ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू  आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.