नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक महोत्सव जल्लोषात संपन्न

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 28 फेब्रुवारी 2024 

अंगभूत कलागुणांना योग्य वयात प्रोत्साहन मिळाले तर ती कला विकसीत होऊन उत्तम कलावंत आकारास येऊ शकतात हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धांमधील विदयार्थ्यांचे उत्तम सादरीकरण पाहिल्यानंतर कौतुक वाटले व या  उपक्रमाचे सार्थक झाले अशा शब्दात नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुकत विजयकुमार म्हसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करीत विदयार्थ्यांची प्रशंसा केली. नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक स्पर्धा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

महापालिका आयुकत  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विष्णुदास भावे नाटयगृहात संपन्न झालेल्या नमुंमपा आंतरशालेय पथनाटय, गायन व नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त  ललिता बाबर, गायन स्पर्धेचे परीक्षक अनिरुध्द जोशी, नृत्य स्पर्धेच्या परीक्षक अश्विनी कासार, परिमंडळ 1 चे  उपआयुक्त  सोमनाथ पोटरे, भांडार विभागाच्या उपआयुक्त  मंगला माळवे, महापालिका सचिवचित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी  अरुणा यादव, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, शिक्षण विस्तार अधिकारी  सुलभा बारघरे व कल्पना गोसावी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी वाचा : शरद पवार यांचे महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यातील भाषण (24 फेब्रुवारी)

विदयार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासासाठी इतकी जागरुक असणारी नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य घरांतून आलेल्या मुलांना इतके मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे हीच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे मत व्यक्त करीत ‘सारेगमप’ व ‘सूर नवा ध्यास’ नवा संगीत स्पर्धांचे विजेते सुप्रसिध्द गायक अनिरुध्द जोशी यांनी आज या स्पर्धेचे परीक्षण करताना बालपण अनुभवायला मिळाले असे सांगितले.

 सोनी मराठीवरील ‘सावित्रीजोती’ मालिेकेतील सावित्रीबाई फुले यांची भूमिका करणाऱ्या नामांकित अभिनेत्री व नृत्यांगना अश्विनी कासार यांनी याप्रसंगी परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना मुलांमधील नृत्यकौशल्य पाहून अचंबित झाल्याचे सांगितले. यापुढील काळात या मुलांच्या नृत्यातील अधिक प्रगतीसाठी त्यांच्याकरिता कोणतेही मानधन न घेता नृत्य प्रशिक्षणाचे शिबीर घेण्याची इच्छा त्यांनी स्वत:हून व्यक्त केली.

क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर यांनी मुलांमध्ये अनेक प्रकारचे गुण असतात, त्यांना फुलविण्यासाठी संधी देण्याची गरज असते. महानगरपालिका शाळांतील मुलांना पालक अशा प्रकारच्या सुविधा अनेक कारणांमुळे उपलब्ध करुन देऊ शकत नाहीत. नेमकी हीच गरज लक्षात घेत क्रीडा व सांस्कृतिक विभागाने शिक्षण विभागाच्या सहयोगाने नमुंमपा शाळेतील मुलांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आणि 5 हजारहून अधिक मुलांनी यात उत्साहाने सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला. यामध्ये मुले, शिक्षक, पालक अशा तिन्ही घटकांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरशालेय पथनाटय, गायन व नृत्य स्पर्धेत सर्वाधिक 125 गुण संपादन करीत नमुंमपा शाळा क्र.18, सानपाडा यांनी यावर्षीचा नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक पटकाविला.

आंतरशालेय पथनाटय स्पर्धेत 72 शाळांनी सहभाग घेतला. स्वच्छता, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, इंटरनेटचे जाळे अशा प्रकारच्या सात सामाजिक आशयाच्या विषयांवर शाळांनी पथनाटय सादर करताना आपल्या परिसरात किमान पाच प्रयोग करावेत अशी अट या स्पर्धा सहभागासाठी होती. त्यामुळे प्राथमिक फेरीत सहभागी होण्यापूर्वीच नमुंमपा क्षेत्रात विविध ठिकाणी 1200 हून अधिक सहभागी विदयार्थ्यांनी 350 हून अधिक प्रयोगातून विविध विषयांवर जनजागृती केली होती. सुप्रसिध्द अभिनेते वैभव सातपुते यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण करुन वीस शाळांची अंतिम फेरीसाठी निवड केली. यामधून जेष्ठ अभिनेते श्री. रमेश वाणी यांनी अंतिम फेरीचे परीक्षण करताना नमुंमपा शाळा क्र.104, राजर्षी शाहू महाराज विदयालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळे यांची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली. नमुंमपा शाळा क्र.71 इंदिरानगर यांनी व्दितीय तसेच नमुंमपा शाळा क्र.113 महापे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. नमुंमपा शाळा क्र.33 पावणे व नमुंमपा शाळा क्र.120 दिवा ऐरोली या शाळा उत्तेजनार्थ पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या.

बातमी वाचा : भाजप,शिवसेनेसोबत जाण्याबाबत माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पत्रप्रपंच – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

अशाच प्रकारे आंतरशालेय गायन स्पर्धेत 1600 हून अधिक मुलांनी सहभागी होत गायनकला पेश केली. यामध्ये 1 ली ते 5 वी या वैयक्तिक गायन लहान गटात 21 सहभागी स्पर्धकांतून ऋत्विक राऊत (नमुंमपा शाळा क्र.31, कोपरखैरणे), रेहाना मुल्ला (नमुंमपा शाळा क्र.18, सानपाडा), सोहम ननावरे (नमुंमपा शाळा क्र.1, बेलापूर) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय पारितो‍षिके संपादन केली. तसेच 6 वी ते 10 वी या वैयक्तिक गायन मोठया गटात 33 सहभागी स्पर्धकांतून नयन थोरात (नमुंमपा शाळा क्र.105, घणसोली), रोहिणी झोरे (नमुंमपा शाळा क्र.116, सानपाडा), श्रावणी गायकवाड (नमुंमपा शाळा क्र.35, से.5 कोपरखैरणे) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय पारितो‍षिके संपादन केली. 1 ली ते 5 वी या समुह गायन लहान गटात 27 सहभागी स्पर्धकांतून नमुंमपा शाळा क्र.38 कोपरखैरणे, नमुंमपा शाळा क्र.6 करावे, नमुंमपा शाळा क्र.92 कुकशेत (इंग्रजी माध्यम) या शाळांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली. त्याचप्रमाणे 6 वी ते 10 वी या समुह गायन मोठया गटात 42 सहभागी स्पर्धकांतून नमुंमपा शाळा क्र.94 कोपरखैरणे (सीबीएसई), नमुंमपा शाळा क्र.36 कोपरखैरणे गाव, नमुंमपा शाळा क्र.33 पावणे या शाळांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली. सुप्रसिध्द गायक  ऋग्वेद देशपांडे यांनी प्राथमिक फेरीचे तसेच सूर नवा ध्यास नवा व सारेगमप संगीत स्पर्धांचे विजेते नामांकीत गायक अनिरुध्द जोशी यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले.

आंतरशालेय नृत्य स्पर्धेत 2000 हून अधिक मुलांनी सहभागी होत नृत्यकला सादर केली. यामध्ये 1 ली ते 5 वी या वैयक्तिक नृत्य लहान गटात 23 सहभागी स्पर्धकांतून श्रेया वानखेडे (नमुंमपा शाळा क्र.95, तुर्भे स्टोअर), परी कुमार (नमुंमपा शाळा क्र.77, यादवनगर ऐरोली), आयेशा शेख (नमुंमपा शाळा क्र.76 घणसोली) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय पारितो‍षिके संपादन केली. तसेच 6 वी ते 10 वी या वैयक्तिक नृत्य मोठया गटात 33 सहभागी स्पर्धकांतून स्वरा रेडीज  (नमुंमपा शाळा क्र.42, घणसोली), दिप्ती मोहोड (नमुंमपा शाळा क्र.92, कुकशेत- इंग्रजी माध्यम), दिव्या उंड्रे (नमुंमपा शाळा क्र.34, श्रमिकनगर) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय पारितो‍षिके संपादन केली. 1 ली ते 5 वी या समुह नृत्य लहान गटात 29 सहभागी स्पर्धकांतून नमुंमपा शाळा क्र.5 दारावे, नमुंमपा शाळा क्र.18 सानपाडा, नमुंमपा शाळा क्र.11 कुकशेत या शाळांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली. त्याचप्रमाणे 6 वी ते 10 वी या समुह नृत्य मोठया गटात 55 सहभागी स्पर्धकांतून नमुंमपा शाळा क्र.47 रबाळे, नमुंमपा शाळा क्र.35 कोपरखैरणे से 5, नमुंमपा शाळा क्र.18 सानपाडा या शाळांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली. नृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण कथ्थक नृत्यांगना  प्रिया मुळे समर्थ व अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द अभिनेत्री  अश्विनी कासार यांनी केले.

ज्या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले त्या शाळेस 100 गुण, व्दितीय क्रमांक मिळालेल्या शाळेस 50 गुण आणि तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या शाळेस 25 गुण प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त 125 एकूण गुण संपादन करणाऱ्या नमुंमपा शाळा क्र 18, सानपाडा या शाळेस नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. हा चषक फिरता असणार असून पुढील वर्षी सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळेकडे तो सुपूर्द केला जाईल. सतत तीन वर्षे एखादया शाळेने हा चषक स्वत:कडे राखल्यास तो त्या शाळेस प्रदान करण्यात येईल.


नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाने शिक्षण विभागाच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या आंतरशालेय सांस्कृतिक चषक महोत्सवाच्या निमित्ताने विदयार्थ्यांमध्ये एक वेगळया प्रकारचा उत्साह दिसून आला व या जल्लोषात या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या.

========================================================


========================================================

========================================================